Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SSC Result : औरंगाबाद विभागातही टक्का घसरला , बीड सर्वाधिक तर हिंगोली सर्वात कमी , सात वर्षातील निच्चांक

Spread the love

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागाने निकालात सात वर्षांतील नीचांकी पातळी गाठली. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १३.६१ टक्क्यांनी निकाल घसरून ७५.२० टक्के लागला. विभागात बीड जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ८१.२३ टक्के लागल. सर्वात कमी निकाल हिंगोली जिल्ह्याचा आहे. या निकालात प्रतिवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली.
शिक्षण मंडळाने १ ते २२ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.८) दुपारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यानंतर विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषद घेत निकालाची वैशिष्ट्ये सांगितली. यावेळी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण, मंडळाचे सहसचिव विजय जोशी यांची उपस्थिती होती.

यावर्षी विभागांतर्गत २ हजार ५१८ शाळांमधील १ लाख ८६ हजार ७९० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १ लाख ८३ हजार २२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३७ हजार ७८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागाचा निकाल मार्च २०१३ नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक घसरला आहे. २०१३ मध्ये ८१.१८ टक्के, २०१४ मध्ये ८७.०६, २०१५ मध्ये ९०.५७, २०१६ मध्ये ८८.०५, २०१७ मध्ये ८८.१५, २०१८ मध्ये ८८.८१ टक्के निकालाची नोंद झाली आहे. यावर्षी १३.६१ टक्क्यांनी घसरण होत ७५.२० टक्के निकाल लागला आहे. विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये बीड जिल्हा प्रथमस्थानी असून, त्याचा निकाल ८१.२३ टक्के आहे. यानंतर औरंगाबाद ७७.२९, जालना ७६.१४, परभणी ६६.३५ आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी ६४.५३ टक्के आहे. विभागाच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८२.२५ आणि मुलांची ६९.५८ टक्के एवढी असल्याचे सुगता पुन्ने यांनी सांगितले. दहावीच्या परीक्षेत विभागात एकूण गैरप्रकार २०८ झाले आहेत. त्या सर्व प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, ४ विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली. २०२ विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करीत पुढील एका परीक्षेला प्रतिबंध आणि २ विद्यार्थ्यांना पुढील पाच परीक्षेला प्रतिबंध घालण्यात आला.

औरंगाबाद विभागात क्रीडा, एनसीसी आणि चित्रकला स्पर्धेत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग, विशेष प्रावीण्य दाखविलेल्या तब्बल १२ हजार ४७५ विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले.
यात सर्वाधिक विद्यार्थी हे चित्रकलेचे आहेत. त्यांची संख्या ११ हजार ३४ एवढी असल्याची माहिती सुगता पुन्ने यांनी दिली.

यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, परीक्षा पद्धती बदलण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापनाच्या नावाखाली शाळेकडून होणारी गुणांची खैरातही थांबविण्यात आली. भाषा विषयासह सामाजिक शास्त्रातील प्रतिविषयांना देण्यात येणारे अंतर्गत २० गुण बंद करण्यात आले होते, तसेच यावर्षी प्रश्नपत्रिकांऐवजी कृतीपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुलांना घोकंपट्टी, पाहून प्रश्न लिहिणे यावर निर्बंध आले होते. ज्ञानरचनावाद स्वीकारल्यामुळे विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांच्या वर्गातील शिकविलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर २० गुणांचे प्रश्न विचारण्यात आले होते. अशा वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा घेतल्यामुळेच दहावीचा निकाल घसरला असल्याचे मत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले, तसेच विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले तीच खरी गुणवत्ता आहे. कमी टक्केवारीमुळे निराश होण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!