Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“त्याने ” फेसबुकवर आत्महत्या करीत असल्याची पोस्ट टाकली आणि राज्याच्या सायबर विभागाने ” त्याला ” वाचविले !!

Spread the love

सोशल मिडियावर सजगतेने नजर ठेवणा-या राज्याच्या सायबर विभागामुळे शनिवारी एका तरुणाला आत्महत्येपासून रोखण्यात पोलिसांनी यश आले आहे. हा प्रकार सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान घडला. हा तरुण कॅबचालक म्हणून काम करतो. तो मूळचा उस्मानाबादचा असून सध्या पत्नीसह हडपसरमध्ये राहत आहे. एमपीएससी करुन शासकीय अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न आहे.  त्यासाठी तो गेल्या ३ वर्षांपासून पुण्यात येऊन राहत आहे. एका बाजूला परिक्षेची तयारीचे टेन्शन, दुसरीकडे पोटापाण्यासाठी कॅब चालविणे व घरात पत्नीशी होणारी वादावादी यामुळे निराश झालेल्या या तरुणाने फेसबुकवरआपण आत्महत्या करीत असल्याचा संदेश टाकला.

मुंबईतील सायबर विभागाच्या पथकाला पुण्यातील एक व्यक्ती आत्महत्या करत असल्याची माहिती सोशल मीडियावरुन मिळाली. सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला दिली.

सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे आणि पथकाने तातडीने त्या व्यक्तीविषयीची माहिती संकलित केली. तांत्रिक तपासात आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेली व्यक्ती हडपसर भागातील असल्याचे समजले. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांना याबाबतची माहिती कळवण्यात आल्यानंतर तातडीने पोलिसांच्या पथकाने त्या व्यक्तीचे घर शोधून काढले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले आणि आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या व्यक्तीला रोखले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात नेले. रात्री उशीरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. दरम्यान, या घटनेची नोंद हडपसर पोलिसांकडून करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!