Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मंत्रालयात नोकरी लावून देण्याच्या आमिषातून ८ लाखाला लावला चुना, पती पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा

Spread the love

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ठाणे महापालिका परिवहनसेवेतील (टीएमटी) कंत्राटी वाहक व त्याच्या बहिणीची आठ लाखांची फसवणूक केल्याची घटना नोव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान घडली आहे. याप्रकरणी दिनेश पवार व पत्नी हेमा (रा. कल्याण पूर्व) या दाम्पत्यासह विद्या पवार (रा. मुलुंड चेकनाका) हिच्याविरोधात फसवणुकीचा व दमदाटी केल्याचा गुन्हा श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

ठाण्यातील किसननगर नं.३ येथे राहणारे सुहास रसाळ हे टीएमटीमध्ये कंत्राटी वाहक आहेत. रसाळ यांचे वडील बेस्टमधून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या वडिलांचे सहकारी राजेंद्र पवार (रा. मुलुंड चेकनाका) हे बेस्ट कामगार आहेत. पवार यांची पत्नी विद्या (४२) या एके दिवशी रसाळ यांच्या ठाण्यातील घरी आल्या. त्यांनी आपला कल्याण येथील पुतण्या दिनेश पवार याची मंत्रालयात ओळख असून तो पैसे घेऊन सरकारी नोकरी लावतो, असे सांगितल्याने त्यावर विश्वास ठेवला. त्यानुसार, नोकरीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह सुरुवातीला एक लाख रु पये दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांना रक्कम देण्याच्या नावाखाली कधी रोख तर, धनादेश व इतर विविध प्रकारे पत्नी हेमा व मित्र मंडळींकरवी साडेपाच लाख उकळले. तसेच बहीण श्रद्धा हिला मुलुंड तहसीलदार कार्यालयात नोकरी लावण्यासाठी एक लाख ६० रुपये हजार दिले. याचदरम्यान, विद्या पवार यांनीही आपला मुलगा शुभम याच्या नोकरीसाठी एक लाख २० हजार रु पये रसाळ यांच्याकडून उसनवार घेऊन आपल्या पुतण्याला दिले.

दरम्यान, डिसेंबर २०१८ मध्ये दिनेश याने मंत्रालय, प्रशासन विभागाचे पत्र रसाळ याच्या मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले. परंतु, तीन महिने उलटूनही कुणालाही नोकरी लागली नाही. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या पत्राची पडताळणी केली असता ते पत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात रक्कम परत मिळावी, यासाठी तगादा लावला असता पवार हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तसेच, दमदाटी करून पोलिसात गेल्यास एक दमडीही परत मिळणार नसल्याचेही त्यांना सांगितले. अखेर या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!