पुन्हा उत्तर प्रदेश : ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून, मृतदेह फेकला गावाच्या स्मशानभुमीत

Spread the love

अलीगडमधील तीन वर्षाच्या मुलीच्या निर्घृण हत्येची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशच्याच हमीरपूरमध्ये एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. मुलीच्या कुटुंबीयांकडून सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. गावात तणावाचं वातावरण असून मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीरपूर येथील कुरारा परिसरात ही घटना घडली आहे. येथील एका कुटुंबातील सदस्य गेल्या दोन महिन्यांपासून मजुरीच्या कामासाठी कानपूरमध्ये राहतात. त्यामुळे ही  ११ वर्षांची मुलगी गेल्या दोन महिन्यांपासून घरात एकटीच रहात होती. शुक्रवारी रात्री काही गुंड घरात घुसले आणि मुलीला उचलून बाहेर घेऊन गेले. त्यानंतर नराधमांनी तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून जीव घेतला आणि तिचा मृतदेह गावाच्या स्मशानभुमीत फेकला. सकाळी गावकऱ्यांना स्मशानभूमीत तिचा मृतदेह मिळाला.

काही ग्रामस्थांनी या मुलीची ओळख पटवली आणि तिच्या कुटुबींयांना आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. थोड्यावेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊ दिला नाही. तिच्या कुटुंबीयांनी सीबीआयच्या चौकशीची मागणी केली जात होती, अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर गावकरी शांत झाले आणि पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपींच्या शोधासाठी पाच विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आपलं सरकार