Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दहावीच्या निकालाची टक्केवारी कमी झाली नाही , गेल्या दहा वर्षातील मार्कांची सूज उतरलीय म्हणतात शिक्षण मंत्री विनोद तावडे !!

Spread the love

यंदा दहावीची निकालाची टक्केवारी ७७.१० टक्के इतकी आहे. गेल्या वर्षीचा निकाल ८९.४१ टक्के लागला होता. त्या निकालाच्या तुलनेत १२.३१ टक्के निकाल कमी लागला. यावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘निकाल घसरल्याने स्वाभाविकपणे काही पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र काही शिक्षण तज्ज्ञांनी या निकालासंदर्भात माझ्याकडे समाधान व्यक्त केले आहे. यंदाचा निकाल म्हणजे गेल्या दहा वर्षात वाढलेली मार्कांची सूज कमी होऊन आलेला निकाल आहे, विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये.’

तावडे म्हणतात, ‘२००७ पर्यंत २० मार्कांचे अंतर्गत गुण देण्याची पध्दत नव्हती. २००८ पासून अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण देण्याची पध्दत सुरु झाली. ही पध्दत २०१८ पर्यंत सुरु होती. गेल्या वर्षापासून आपण ती थांबविली. परंतु २००७ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देण्याची पध्दत नव्हती. त्यावेळी शालांत परीक्षेचा निकाल हा ७८ टक्के लागला होता आणि त्यानंतर जेंव्हा ही पध्दत २००८ मध्ये सुरु झाली, त्यावेळी शालांत परीक्षेचा निकाल ८७.४१ टक्के इतका लागला. या निकालात २००७ च्या तुलनेत सुमारे ९ टक्के एकदम वाढ झाली. खऱ्या अर्थाने यंदा जो १२.३१ टक्के निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. तो कमी निकाल म्हणजे वाढलेल्या गुणांची सूज कमी झाली.’ ‘विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन केले पाहिजे, जेणेकरुन त्या विद्यार्थीला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर योग्य दिशा दहावीलाच मिळू शकेल. केवळ दहावीला जास्त मार्क मिळाले व पास झाल्यानंतर मग ११ वी प्रवेश घ्यायचा आणि मग पदवीधर व्हायचे आणि बेरोजगारांच्या कारखान्यात दाखल व्हायचे, यापेक्षा दहावीच्या निकालात जर विद्यार्थ्यााला त्याची गुणवत्ता कळली तर तो विद्यार्थी त्या पध्दतीचे करिअर निवडू शकतो, त्यातून त्या विद्यार्थ्याला चांगली संधी मिळू शकेल. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना आवाहन करत आहोत की, या निकालामुळे निराश होण्याचे कारण नाही,’ असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.

‘दहावीच्या निकालामधून विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेची दिशा आता कळली असेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करा. मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाते. या फेर परीक्षेसाठी जर महिन्याभरात चांगला अभ्यास केला तर स्वाभाविकपणे फेरपरीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेता येईल, अन्यथा विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास अभ्यासक्रमाची व्यवस्था सुध्दा करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या आधारे विद्यार्थी शिक्षित झाला तर तो विद्यार्थी आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. २०१८-१९ मधील इ. ११ वी ऑनलाईन प्रवेशाची विविध बोर्डाची आकडेवारी पाहता, अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची संख्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे यंदा दहावीच्या निकालात कमी गुण मिळाले म्हणून निराश होण्याचे कारण नाही. फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि करिअर निवडण्याची एक संधी मिळाली आहे, यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा,’ असे तावडे यांचे म्हणणे आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!