धक्कादायक : १० हजारांच्या कर्जापायी २ वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या

Spread the love

उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे एका दाम्पत्याने १० हजार रुपयांचे कर्ज थकवल्याने दोन जणांनी त्या दाम्पत्याच्या अडीच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली आहे. या घटनेने देशभरातून संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

Advertisements

याप्रकरणी आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी न्याय दिला जावा अशी मागणी केली आहे. या दोघांनीही ट्विट करून या चिमुरडीला न्याय द्या अशी मागणी केली आहे.

अलीगढमधील टप्पल परिसरात राहणारी अडीच वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. २ जून रोजी तिचा मृतदेह गावाबाहेरील कचराकुंडीजवळ सापडला होता. हत्या करणाऱ्यांनी मुलीचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न देखील केला होता. गावातील भटके कुत्रे एका लहान मुलीच्या मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे ग्रामस्थाने बघितले आणि या घटनेची माहिती त्याने पोलिसांना दिली. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. सोशल मीडियावरही अनेक सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध केला होता.

मात्र, मुलीच्या शवविच्छेदनात मृत्यूचे कारण स्पष्ट झाले. मुलीवर बलात्कार झाला नव्हता, मात्र तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या घराजवळ राहणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. या दोघांचा मुलीच्या आई- वडिलांसोबत पैशांवरुन वाद होता. मुलीच्या आई-वडिलांनी आरोपींकडून १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, याची परतफेड न केल्याने आरोपी आणि मुलीचे आई- वडिल यांच्यात वाद होता. पैशांची परतफेड न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आरोपींनी त्या दाम्पत्याला दिली होती. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आपलं सरकार