Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लाखो शिवभक्तांच्या अपूर्व उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात संपन्न…

Spread the love

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४५ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे राज्याभिषेक सोहळ्यात महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करीत असताना युवराज संभाजीराजे व युवराजकुमार शहाजीराजेंसोबत राजसदरेवर बसण्याचा बहुमान एका शेतकरी कुटुंबाला देण्यात आला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आणि वडिलांना राज्याभिषेकावेळी राजसदरेवर बसविण्यात आले होते.

शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राजकारभाराच्या नीतिवर राज्य सरकारने अमल करण्याची गरज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी केले. यावेळी मराठा आरक्षण दिले पाहिजे, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले. शिवरायांच्या जयघोषांत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने ३४५ वा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी रायगड येथे पार पडला. यावेळी हजारों शिवप्रेमीच्या उपस्थितीत खासदार संभाजीराजेनी राजसदरेवरून शिवप्रेमींना संबोधित केले. यावेळी चीनचे राजदूत लीयू बिन्ग, पोलंडचे राजदूत दमियन इरज्याक, सचिव इवा स्टेन्किइव्हीक्झ, तुनिसियाचे राजदूत नेज्मेद्दिन लखाल, बुलग्रीयाचे राजदूत इलेनोरा दिम्तीवा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी अनिल पारस्कर, तहसीलदार चंद्रसेन पवार, कोल्हापुरचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख उपस्थित होते.

रयतेच्या राजाच्या राज्याभिषेकाचा मान रयतेला मिळाला पाहिजे, असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी शेतकरी कुटुंबाला हा सन्मान दिला. रायगडावरीलशिवराज्याभिषेक सोहळ्याला रयतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचार या शेतक-यांच्या कुटूंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली. या शेतकरी कुटूंबियाच्या हस्ते पूजनही झाले. तसेच, त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनावेळी मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे, यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी शेतकरी कुटुंबीयाचा सन्मान करण्यात आला. लक्ष्मण अवचार यांनी नापिकी, दुष्काळीस्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे १९ मे २०१५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. वयाच्या २५ व्या वर्षी लक्ष्मण यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या जाण्याने अवचार कुटंबियांवर मोठे संकट उभारले. तर, वडिल गणपती, आई चिवाबाई, पत्नी रेश्मा यांना मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यामुळेच, छत्रपती संभाजी महाराजांनी विशेष निमंत्रण देऊन या शेतकरी कुटुंबीयास शिवराज्याभिषेकावेळी राजसदरेवर बसण्याचा बहुमान दिला. रयतेच्या हस्ते राज्याभिषेक झाल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने रयतेचा सोहळा ठरेल, असे छत्रपती संभजीराजे यांनी म्हटले होते. त्यानुसार, अवचार कुटुंबीयांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने येथे गुरुवारी ३४५वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी गडपूजन आणि जागर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.

कोल्हापूर हायर्कसच्या वतीने गडपूजन सोहळ्यासाठी राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवरून तसेच लेह लडाख येथील स्टोट कांग्रीचे जल आणण्यात आले होते. खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाले. त्यानंतर शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. राज्यातील युद्धकला आखाड्यांचा यात सहभाग होता. तलवार, भाला, जांबिया, माडू, फरी- गदगा यांचे सादरीकरण झाले. या वेळी इतिहास अभ्यासक राम यादव यांच्या दुर्गराज रायगड परिचित-अपरिचित स्थळांचे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
बुधवारी दिवसभर शिवभक्तांनी रायगडावर स्वच्छता मोहीम राबविली. बा रायगड परिवाराच्या वतीने ३१० शिवसैनिक, तर नामाचे मानकरी (लाटवडे, ता. हातकणंगले) या मोहिमेत सहभागी झाले. सोलापूरच्या विजय क्षीरसागर या चिमुकल्याने पोवाड्याचे गायन केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती यांच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा, दुर्गराज रायगड येथे गुरुवारपासून सुरू झाला. यावेळी ‘जागर शिवकालीन युध्दकलेचा’ या मर्दानी खेळाचे सादरीकरण झाले. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी होळीच्या माळावर आपली युध्दकला या माध्यमातून सादर केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!