Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विचारधारा वेगळी असली तरी जनसंपर्क आणि चिकाटी संघाकडून शिका , पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, रांगेची चर्चा थांबविण्याचं आवाहन

Spread the love

आगामी विधानसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आजपासून विभागनिहाय बैठकांना सुरुवात केली असून विचारधारा वेगळी असली तरी  ‘जनसंपर्क कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांकडून शिकायला हवं. त्यांच्यासारखी चिकाटी हवी,’ असा कानमंत्र  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आज दिला.

पुण्यातील भोसरी मतदारसंघातून याची सुरुवात झाली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार यांनी संघ स्वयंसेवकांच्या कामाचं कौतुक केलं. त्यासाठी एका खासदारांनी सांगितलेला किस्साच त्यांनी ऐकवला. ‘आरएसएसचे सदस्य कसा प्रचार करतात हे लक्षात घ्यायला हवं. ते पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि त्यातले एखादे घर बंद असले तर ते संध्याकाळी जातात. संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातात, पण त्या घरी जाऊनच येतात. हे त्यांच्याकडून शिकायला हवं,’ असं ते म्हणाले.

‘लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच घरोघरी जाऊन भेटायला हवं. आतापासून भेटत राहिलात तर ऐनवेळी आठवण आली का? असा प्रश्न निवडणुकीच्या वेळी मतदार विचारणार नाहीत, असं पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल,’ असंही त्यांनी सांगितलं.

मोदींच्या शपथविधी सोहळ्यातील रांगेच्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘रांगेवरून निर्माण झालेल्या वादात कोणा एकाची चूक झाली असावी. ती माझ्या कार्यालयाची असेल किंवा त्यांच्या कार्यालयाची. पण तो विषय इतका मोठा नाही. तो आता संपायला हवा,’ असं मत पवार यांनी व्यक्त केलं आहे.

या संदर्भात पवारांनी आज पुण्यातील भोसरी इथं पत्रकारांशी बोलताना त्यांची बाजू मांडली. ‘माझ्या सचिवांनी बैठक व्यवस्थेबद्दल दोनवेळा चौकशी केली होती. मात्र, दोन्ही वेळी एकच उत्तर देण्यात आलं. कुणाकडून तरी त्रुटी राहिली असण्याची शक्यता आहे. मात्र हा विषय आता संपवायला हवा,’ असं ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!