आरक्षण आणि वाढीव दुष्काळ निधीसाठी मुख्यमंत्री दिल्ली दरबारात

Spread the love

राज्यातील वैद्यकीय शाखेच्या प्रवेशातील आरक्षण आणि भीषण दुष्काळ या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय आयोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. एसईबीसी आणि आर्थिक कमकुवत घटकांना आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्यात याव्यात, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली.

Advertisements

मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यसरकारच्या वतीने विनंतीपत्र डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सादर केले. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या ८१३ जागा तर पदवी शाखांमध्ये १७४० जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिले.

राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नासंदर्भात फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती फडणवीस यांनी शहा यांना दिली. याशिवाय, केंद्रीय गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल फडणवीस यांनी शहा यांचे अभिनंदनही केले.

आपलं सरकार