Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मान्सून सहा जूनला केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे

Spread the love

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह आता जोर धरू लागला असून, सोमवारी मान्सूनने मालदीव, कोमोरीनसह दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश केला. मान्सूनच्या पुढील प्रगतीस हवामान अनुकूल असून, सहा जून रोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. अंदमान-निकोबार बेटांवर १८ मे रोजी दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर नसल्यामुळे, तसेच बाष्पाचा अभाव असल्यामुळे मान्सूनची पुढील प्रगती थांबली होती. आता मात्र, दक्षिण गोलार्धातून विषुववृत्त ओलांडून येणारा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह जोर पकडू लागला आहे. दक्षिण अरबी समुद्रात ढंगांचीही दाटी झाली आहे. ही मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

मान्सूनने सोमवारी मालदीव, कोमोरीनसह दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश केला. पाच जूनला मान्सूनची प्रगती दर्शवणारा ईस्ट-वेस्ट शिअर झोन (वातावरणात तीन किलोमीटर उंचीवर विरुद्ध दिशांच्या वाऱ्यांचा मिलाफ होणारे क्षेत्र) दक्षिण भारतावर तयार होण्याची शक्यता असून, या क्षेत्राच्या निर्मितीसोबत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होईल. तसेच, पुढील ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत, तसेच बंगालच्या उपसागराच्या आग्नेय, नैऋत्य आणि मध्य भागांमध्येही मान्सून पोचेल, असा अंदाज ‘आयएमडी’ने दिला आहे.

दरम्यान, मध्य भारतात उष्णतेचा कहर कायम असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा आयएमडीने दिला आहे. विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरींची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!