Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बंगालच्या भूमीत नकारात्मकता निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न , विरोध घोषणेला नाही राजकारणाला : ममता

Spread the love

‘कोणत्याही राजकीय पक्षाच्या घोषणेला माझा काहीही आक्षेप नाही. ‘जय सियाराम’, ‘जय श्रीराम’ आणि ‘जय रामजी की’ या धार्मिक घोषणेमागच्या भावनाही मी समजून आहे. मात्र भाजप ‘जय श्रीराम’चा वापर राजकारणासाठी करत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या राजकीय घोषणा लादण्याचा भाजपकडून होत असलेला प्रयत्न आम्ही कदापिही खपवून घेणार नाही,’ असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत ‘जय श्रीराम’चा नारा देत भाजपनं पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून काढलं होतं. त्यावर ममता बॅनर्जी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची भूमिका मांडली आहे. ‘भाजप समर्थक फेक व्हिडिओ आणि फेक बातम्यांद्वारे गैरसमज पसरवित असल्याचं लोकांना मला सांगायचं आहे. भाजपच्या खोट्या बातम्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून वास्तव दडवून ठेवलं जात आहे. राजाराम मोहन राय पासून ते पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर पर्यंतची ही भूमी आहे. परंतु, भाजप बंगालच्या या भूमीत नकारात्मकता निर्माण करण्याचं काम करत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय.

प्रत्येक राजकीय पक्षाची एक घोषणा असते. ‘जय हिंद’ आणि ‘वंदे मातरम’ ही आमच्या पक्षाची घोषणा आहे. डावे पक्ष ‘इन्कलाब जिंदाबाद’ची घोषणा देतात. इतर पक्ष इतर घोषणा देतात. आम्ही एकमेकांच्या घोषणांचा सन्मान आणि आदरच करतो, असं सांगतानाच जय सियाराम, जय रामजी की, राम नाम सत्य है सारख्या घोषणांचा धार्मिक आणि सामाजिक अर्थ आहे. आम्ही या भावनांचाही आदर करतो. परंतु भाजप जय श्रीराम या धार्मिक घोषणेचा राजकारणासाठी वापर करत आहे. धर्म आणि राजकारणाची ते घुसळण करत असून ते योग्य नाही,’ असं त्या म्हणाल्या.

केवळ राजकीय हेतूने थोपविल्या जाणाऱ्या या घोषणांचा आम्ही सन्मान करत नाही. हे काम केवळ आणि केवळ कथितपणे आरएसएसच्या नावाने केलं जात आहे. भाजप जाणूनबुजून द्वेषाची विचारधारा पेरत असून त्यातून तोडफोड आणि हिंसा घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला रोखण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!