Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates डॉ. पायल तडवी यांचा सातत्याने जातिवाचक छळ केला जात होता, गुन्हे शाखेची न्यायालयात माहिती

Spread the love

डॉ. पायल तडवी यांचा अटक केलेल्या तिन्ही वरिष्ठ डॉक्टरांकडून सातत्याने जातिवाचक छळ केला जात होता, अशी माहिती प्रमुख साक्षीदाराच्या जबाबातून पुढे आल्याची माहिती गुरुवारी गुन्हे शाखेने सत्र न्यायालयाला दिली. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार तरुणीने आपल्या जबाबात आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेर किरकोळ कारणावरून सातत्याने डॉ. पायल यांना जातिवाचक शब्द वापरून अपमानित करत असत, असे सांगितले असल्याची माहिती दिल्याचे गुन्हे शाखेने गुरुवारी सत्र न्यायालयाला सांगितले.

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात प्रवेश घेतल्यापासून पायल यांचा छळ सुरू होता. अनुसूचित जमातीसाठीच्या आरक्षणातून प्रवेश मिळाल्यामुळेच पायलचा छळ सुरू होता हे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट होते, असा दावाही गुन्हे शाखेने न्यायालयात केला. पायल अनुसूचित जमातीची आहे हे आरोपी डॉक्टरना माहीत होते. त्यामुळे त्यांनी केलेला छळ ही कृती गुन्हेगारी कटाचा भाग असण्याची दाट शक्यता आहे. या कटात आणखी कोण सहभागी आहे किंवा आरोपी डॉक्टरनी पायलचा छळ कोणाच्या सांगण्यावरून केला हे शोधून काढणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका गुन्हे शाखेने न्यायालयात घेतली.

लेखी तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी कुटुंबावर रुग्णालयातूनच दबाव : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

दरम्यान डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येपूर्वी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे केलेला लेखी तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी कुटुंबावर रुग्णालयातूनच दबाव आणला गेला, असा दावा अ‍ॅड्. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. अ‍ॅड्. सदावर्ते तडवी कुटुंबाचे वकील आहेत. १३ मे रोजी डॉ. पायल यांची आई अबेदा अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. प्रत्यक्ष भेटून स्त्रीरोग विभागातील वरिष्ठ डॉक्टरकडून वर्षभरापासून सुरू असलेले रॅगिंग, जातिवाचक छळाबाबत त्या डॉ. भारमल यांच्याकडे तक्रार करणार होत्या. मात्र अधिष्ठाता कार्यालयातील शिपायाने भेट नाकारून लेखी तक्रार टपालाद्वारे करा, अशी सूचना त्यांना केली. त्यानुसार लेखी तक्रार टपालाद्वारे देण्यासाठी अबेदा यांनी पोचपावती घेतली. मात्र या दरम्यान रुग्णालयातील दोन व्याख्यात्यांनी, तक्रार केल्यास डॉ. पायल यांचा छळ आणखी वाढेल, अशी भीती घातली. त्यामुळे डॉ. पायल यांचे पती सलमान यांनी लेखी तक्रार अर्ज मागे घेतला, असे सदावर्ते यांनी सांगितले. डॉ. पायल यांच्या छळाची व्याप्ती अटक आरोपींपुरती मर्यादित नसून रुग्णालय प्रशासन, प्रशासनातील व्याख्यात्या आणि अन्य अधिकारी त्यास जबाबदार आहेत, असा दावाही त्यांनी केला.

तिन्ही आरोपी डॉक्टर उच्चशिक्षित असून गुन्हा नोंद झाल्यानंतर अत्यंत सराईतपणे त्यांनी अटक टाळली. अटक झाल्यास तिघींनी चौकशीला सहकार्य न करता आरोप कसे झटकावेत यासाठी व्यूहरचना आखली. त्यानुसार तिन्ही आरोपींनी एकसारखीच माहिती पुढे केली. बुधवारी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला गेला. एक दिवस प्रक्रिया पूर्ण करण्यात वाया गेला. त्यामुळे प्रत्यक्ष तपास करणे गुन्हे शाखेला शक्य नव्हते, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड्. राजा ठाकरे यांनी केला. त्यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. गुन्हा नोंद झाल्यापासून आग्रीपाडा पोलिसांनी तपास केला होता. आरोपी त्यांच्या कोठडीत होत्या. आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंद झाले आहेत. तपासात कोणतीच प्रगती नसल्याने आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड्. आबाद पोंडा यांनी  केली. ती ग्राह्य़ धरत न्यायालयाने आरोपी असलेल्या तिन्ही डॉक्टरांना न्यायालयीन कोठडी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!