Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पोलीस निरीक्षकाकडून लैंगिक छळ आणि बातम्यांच्या त्रासामुळे महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Spread the love

पोलीस निरीक्षकाकडून लैंगिक छळ आणि पत्रकाराकडून खोट्या बातम्या छापून त्रास दिल्याने उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनिषा गिरी यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. गिरी या घटनेत गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर शहरातल्या एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना सोलापूरच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. रात्री उशीरापर्यंत या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरु होती.

आनंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक मनीषा गिरी यांना स्वतःच्या केबिनमध्ये बोलावून अश्लील बोलणे, लैंगिक छळ केल्याप्रकरणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांमार्फत सुरू होती. दरम्यान विकास खाडे नावाच्या बोगस पत्रकाराने पोलीस उपनिरीक्षक मनीषा गिरी यांना मोबाइलमध्ये काढलेले फोटो दाखवून ब्लॅकमेलींग करण्याचा प्रकार केला होता. त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून बोगस पत्रकार खाडे हा सतत गिरी यांना त्रास देत असल्याचा आरोप गिरी यांच्या आई-वडील व नातेवाईकांनी केला आहे.

मार्च महिन्यात आनंदनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पोलीस निरीक्षकांनी त्यांचा लैंगिक छळ केला होता. तशी त्यांनी २८ मार्च रोजी स्टेशन डायरीमध्ये नोंद केली होती. त्यानंतर गिरी यांची उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी सुरु आहे. मात्र गिरी यांच्यावर दबाब आणला जात होता, तसेच स्वतःला पत्रकार म्हणून घेणारा विकास खाडे यानेही दबाव आणल्याने मनीषा गिरी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गिरी यांच्या आई-वडिलांनी केला आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!