Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ पायलने आत्महत्या केली नाही , तिची हत्याच झाल्याचा पायलच्या वकिलांनी का केला दावा ?

Spread the love

डॉ. पायल तडवी प्रकरणाला आता एक वेगळेच वळण लागल्याचे दिसत आहे. पायलने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिनही महिला डॉक्टरांना बुधवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांना न्यायालयाकडे त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पायलची हत्या झाली असल्याचा दावा तिच्या वकीलांनी न्यायालयासमोर केला. तसेच त्या तिनही डॉक्टरांनी व्हॉट्सअॅपचा जो डेटा डिलिट केला आहे, तो आम्हाला परत मिळवायचा आहे. या संदर्भात न्यायालयात युक्तीवाद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  पायलच्या शरीरावर जखमा आढळल्या असून त्या जखमा कसल्या आहेत याचा तपास करणेही महत्वाचे असल्याचे सातपुते यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले.

पायलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही गायब असून त्याचाही शोध घेणे आवश्यक असल्याचे सातपुते यांनी सांगितले. पायलच्या शरीरावर काही जखमाही आढळल्या आहेत. पायलची हत्या करण्यात आली आहे किंवा तिला काही मारहाण झाली आहे किंवा तिला मारहाण करून फाशी देण्यात आली आहे, अशी आमची शंका आहे. तिच्या अंगावर असलेल्या जखमा पाहिल्याचे काही साक्षीदारदेखील आहेत. सध्या जे काही चित्र सर्वांसमोर उभे केले जात आहे, ते खोटे आहे. तसेच आता प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. तसेच आमचे यासंदर्भात सहाय्यक आयुक्तांशीही बोलणे झाले आहे. पुढील तपासासाठी आम्ही न्यायालयाकडे वेळ मागितला आहे, असेही त्यांनी बोलताना सांगितले.

पायलचे शवविच्छेदन जेजे रुग्णालयातील ज्युनियर डॉक्टरांनी केले आहे. यामध्ये नेमून दिलेल्या गाईडलाईसनचे उल्लंघन झाले असल्याचे सातपुते यांनी सांगितले. तसेच शवविच्छेदन करताना वरिष्ठ डॉक्टर असोसिएट, प्राध्यापक किंवा सिव्हिल सर्जन उपस्थित नव्हता. त्यामुळे शवविच्छेदन योग्य पद्धतीने झाले नसल्याची शंका त्यांनी उपस्थित केली. तसेच जाणुनबुजून यामध्ये वरिष्ठ डॉक्टरांना सहभागी केले नाही, असा आरोपही त्यांनी केला. तसेच हे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचीही मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या तीन डॉक्टरांमधील डॉ. भक्ती मेहेरला मंगळवारी दुपारी सत्र न्यायालयाच्या बाहेर अटक करण्यात आली होती. तर डॉ. हेमा अहुजा हिला रात्री अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातून अटक करण्यात आली. आग्रीपाडा पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली. महिलेला रात्री अटक करणे कायदेशीर नसल्याने डॉ. हेमा अहुजाला अटक करण्यासाठी न्यायाधीशांची विशेष परवानगी घेण्यात आली होती. डॉ. पायलने या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून म्हणजेच मागील वर्षभरापासून या तिघी पायलला छळत होत्या. जातीवाचक टीपण्णी करत होत्या. या तिघी कशाप्रकारे त्रास देतात हे पायलने सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तिचे म्हणणे कुणीही ऐकून घेतले नाही. दरम्यान, तिच्या आत्महत्येनंतर या तिघीही फरार झाल्या होत्या.

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या उद्देशाने एक पत्र नायर रूग्णालयाच्या संचालकांना लिहिले आहे. पायल तडवीच्या मृत्यूबाबत नायर रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांनाही पत्र लिहिण्यात आले होते. पायलच्या आई वडिलांनी पायल तडवीचा मृत्यू ही हत्या असल्याचा आरोप केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!