Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आगामी विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्वाची ठरेल ?

Spread the love

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाण्याचा निर्धार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला असून वंचित बहुजन आघाडीनेही महाआघाडीत सामील व्हावे, त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. परंतु वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीतील परफॉर्मन्स पाहता, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सामान पातळीवर जागा वाटप करण्याच्या अटी आणि शर्ती महाआघाडीला मान्य होतील का हा खरा प्रश्न आहे. आम्ही कुणाचे गुलाम नाही अशी गर्जना आधीच प्रकाश आंबेडकर यांनी केली असून जनता दल, एमआयएम यांना सोबत घेऊन विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याची घोषणा आधीच त्यांनी केलेली असतानाही वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास महाआघाडी इच्छुक असली तरी प्रकाश आंबेडकर त्यांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणूक निकालानंतर महाआघाडीच्या नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. या वेळी काँग्रेसच्या वतीने अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसिम खान, शरद रणपिसे, राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील. नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रिफ, तसेच शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, समाजवादी पक्षाचे अबू असिम आझमी, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन पक्षाचे (गवई गट) डॉ. राजेंद्र गवई, आमदार रवी राणा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, आदी नेते उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील निकालावर या वेळी चर्चा झाली. त्याचबरोबर राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पिण्याच्या पाण्याचा, चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सरकारचा कारभार धिम्या गतीने सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. विधानसभा निवडणुका एकजुटीने लढविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.  वंचित आघाडीने बरोबर यावे, अशी सर्वाचीच इच्छा आहे, परंतु त्यांच्या मनात काय आहे, हे  माहीत नाही, असे चव्हाण म्हणाले. जयंत पाटील यांनीही तशीच भूमिका मांडली. वंचित आघाडीसाठी चर्चेचे दरवाचे खुले आहेत, असे त्यांनी सांगितले. मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्याबाबत या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.  आगामी निवडणुकीत भाजप-सेनेचा पराभव करायचा असल्यास, वंचित आघाडीला बरोबर घ्यावे लागेल, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.  दरम्यान, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर काही आमदार भाजपच्या वाटेवर आहेत,  अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, त्याकडे चव्हाण यांचे लक्ष वेधले असता त्यांनी त्याचा इन्कार केला. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

या सर्व पार्श्वभूमीवर लोकसभेप्रमाणेच वंचित बहुजन आघाडीची भूमिका विधानसभेलाही निर्णायक ठरेल का ? हा खरा प्रश्न आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी शिवाय महाआघाडी यशापर्यंत पोहचेल कि नाही हे सांगणे अवघड आहे. दरम्यान महा आघाडीकडून युतीसाठी फारच आग्रह झाला तर लोकसभेत भुईसपाट झालेल्या काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या अर्ध्या जागा आणि मुख्यमंत्रीपद मागितले तर आश्चर्य वाटता कामा  नये. अन्यथा वंचित बहुजन आघाडी पुन्हा स्वबळावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!