It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

निकालावर विचार मंथन , वंचित बहुजन आघाडीमुळे भाजप -सेना युतीलाच फायदा : अशोक चव्हाण

Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला. पुन्हा एकदा राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपाच्या पारड्यात मते दिली. मात्र अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या लाख-दिड लाख मतांनी आघाडीला नुकसान झालं तर भाजपा-शिवसेना युतीला फायदा झाल्याचं दिसलं. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे. त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी उमेदवार उभे केले अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी निवडणुकीच्या निकालांवर भाष्य केलं. त्यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, अनेक जागांवर वंचित बहुजन आघाडीमुळे फटका बसला हे आकडेवारीवरुन दिसतंय. प्रकाश आंबेडकर यांच्या हट्टापायी काँग्रेस-राष्ट्रवादीचं मोठं नुकसान झालं. वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. विजयी होण्यासाठी चार साडेलाख मतांची गरज मात्र अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी लाख-दिड लाख मते घेतली असं सांगत अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. तसेच राज्यातील सर्व काँग्रेस उमेदवारांशी चर्चा करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर मंथन करण्याची गरज आहे. महागाई, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार या सगळ्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली असताना काँग्रेसचा पराभव झाला याचा आढावा घेतला जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आघाडीतल्या घटकपक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

दरम्यान काँग्रेसच्या पराभवाला फक्त राहुल गांधी जबाबदार नाहीत. राहुल गांधी यांनी पदावर राहावं. विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल करण्याची गरज आहेत ते नेतृत्वाने करावे. माझ्यासह इतर राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी सामुहिक राजीनामे द्यावेत. पराभवाचं खापर राहुल गांधी यांच्यावर फोडता कामा नये असं अशोक चव्हाणांनी सांगितले.

काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी आक्रमक नेत्याची नियुक्ती करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहे. मात्र यावर नारायण राणेंच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही असं उत्तर अशोक चव्हाणांनी दिलं.

 

विविधा