Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सोळावी लोकसभा बरखास्त , पंतप्रधान पदाचा राजीनामा , मोदी झाले हंगामी पंतप्रधान

Spread the love

सतराव्या लोकसभेचे निकाल आल्यानंतर लोकसभा विसर्जित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. हा राजीनामा स्वीकारतानाच नवे सरकार स्थापन होईपर्यंत कार्यभार वाहण्याचा आग्रह राष्ट्रपतींनी मोदी मंत्रिमंडळाला केला आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोळावी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सायंकाळी राष्ट्रपतींची भेट घेऊन मंत्रिमंडळाच्या वतीने सामूहिक राजीनामापत्र राष्ट्रपतींना सुपूर्द केलं. हा राजीनामा राष्ट्रपतींनी लगेचच मंजूर केला. त्यामुळे सतरावी लोकसभा अस्तित्वात येण्याची प्रक्रिया एकप्रकारे सुरू झाली आहे. सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जून रोजी संपत आहे. सतरावी लोकसभा ३ जूनच्या आधी अस्तित्वात येणार आहे.

‘विद्यमान सरकारच्या कार्यकाळाचा सूर्यास्त होत असला तरी सरकारने केलेल्या भरीव कामांच्या प्रकाशाने सामान्य जनांचं आयुष्य अखंडपणे उजळून निघणार आहे. आता नव्या सूर्योदयाची प्रतीक्षा आहे. नवा कार्यकाळ लवकरच सुरू होत आहे. सर्वांच्या स्वप्नातील ‘नवा भारत’ घडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. १३० कोटी भारतीयांचं प्रत्येक स्वप्न साकारण्याचा आम्ही दृढसंकल्प केला आहे,’ असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर केलं आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला सुषमा स्वराज, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, मनेका गांधी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे मंत्री उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अरुण जेटली या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!