Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रातील मराठवाडा , विदर्भात पुढील चार दिवस उष्णतेची लाट , कोकणात मात्र पावसाचे संकेत

Spread the love

मॉन्सून जवळ येत असतानाच राज्याच्या बहुतांश भागामध्ये गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात झपाटय़ाने वाढ झाली असून, पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाडय़ात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण विभागात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचाही अंदाज आहे.

विदर्भामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. मराठवाडय़ातही कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. त्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्रातील तापमानातही अचानक मोठय़ा प्रमाणावर वाढ सुरू झाली असून, बहुतांश ठिकाणी सध्या उष्णतेची लाट आहे. कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलमेत ३ ते ५ अंशांनी वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, मालेगाव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी येथे सध्या उष्णतेची लाट आहे. ती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. कोकणातही तापमानात वाढ झाली आहे. मुंबई, रत्नागिरी येथील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढले आहे.

राज्याच्या सागरी किनाऱ्यावर पुढील चार ते पाच दिवसांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, डहाणू, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, गोव्यातील तापमान कमी होऊ शकणार आहे. उर्वरित राज्यात मात्र तापमान अधिक राहणार आहे.महाबळेश्वरचा पाराही वाढला आहे. तेथील कमाल तापमान सोमवारी ३५.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!