Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

यांचं तर ठरलं !! काहीही झाले तरी मोदी २५ मे ला शपथ घेणार आणि २६ मे ला आकाशवाणीवर ” मन कि बात ” करणार !!

Spread the love

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होई पर्यंत ना सत्ताधारी थांबायला तयार आहेत ना विरोधक अद्याप सातव्या टप्प्याचे मतदान बाकी असतानाच दोन्हीही बाजूंच्या नेत्यांनी बोहल्यावर उभे राहण्याची तयारी चालू केली आहे . मोदींनी तर निव्वळ बाशिंगच बांधले नाही तर , घोडाही तयार ठेवला असून आपणच पुन्हा पंतप्रधान बनणार अशी खूणगाठ बांधून त्यांनी तर शपथविधीचीही तयारी केली आहे . त्यांनी ठरविल्यानुसार  ते २५ मे रोजी ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून निवडणूक लढवलेल्या भाजपच्या खासदारांनी तत्काळ निवडणूक अधिकाऱ्याकडून विजयाचे प्रमाणपत्र घेऊन २४ मे रोजी दिल्ली गाठावी , असे भाजपने त्यांना कळवले असल्याचे विशेष वृत्त लोकमत ऑनलाईनने दिले आहे.

खरे तर नरेंद्र मोदींनी हे अमित शहा आयोजित पत्रकार परिषदेतच जाहीर करून टाकायला हवे होते परंतु त्यांनी हि कार्यक्रम पत्रिका गोपनीय ठेवली असावी . बाकी काहीही असले तरी केंद्रात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी अजिबात वेळ न दवडता होईल तेवढ्या लवकर कामाला सुरुवात करावी , असे संकेतच त्यांनी दिलेअसल्याचे या वृत्तात म्हटले आहे . २०१४ मध्ये १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी त्यांनी १० दिवस घेतले होते.
यंदा मात्र मोदी यांना जिंकण्याचा आत्मविश्वास असल्याने लगेच सरकार स्थापन करायचे आहे म्हणजे सरकार आहेच ते कंटिन्यू करायचे आहे. पुढील सरकारच्या योजना आणि १०० दिवसांची ब्ल्यू प्रिंट त्यांच्याकडे तयार आहे फक्त विजयाचे प्रमाणपत्र तेवढे बाकी आहे . लोकमतने खास सूत्रांचा हवाला देऊन असेही म्हटले आहे कि , शपथविधी झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मोदी त्यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे २६ मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू करतील. त्यांचे सूत्र सांगतात कि ,  मोदी हे बहुमतापासून थोडेसे दूर राहिले, तरी  २५ मे रोजी पदाची शपथ डामडौल न करता घेतील पण  ‘मन की बात’ही करतीलच . कारण मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रम गेल्या मार्च महिन्यात स्थगित केला होता व तेव्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा तो सुरू करण्याचे आश्वासनही दिले होते.

या वृत्तात पुढे म्हटलं आहे कि , ल्युटेन्स दिल्ली आणि खान मार्केट टोळीच्या कारवायांची मोदी यांना आता पूर्ण ओळख झाली असून, गेल्या पाच वर्षांत त्यांनी त्या सगळ्यांना यशस्वी तोंड दिले आहे. ते आता सरकार स्थापन करण्यास अजिबात विलंब लावणार नाहीत. मग भाजपला स्पष्ट बहुमत मिळो कि न मिळो कारण राष्ट्रपती,  मोदी यांना २४ मे रोजी १७ वी लोकसभा अधिसूचित होताच सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून सरकार स्थापन करण्यास बोलावतील असा मोदींना पूर्ण विश्वास आहे.
शिवाय भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सर्व शक्यता आधीच गृहीत धरून भाजपेतर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या पक्षांनाही  रालोआच्या कार्यक्रम पत्रिकेवर विश्वास असेल, तर रालोआमध्ये येण्याचे निमंत्रण देऊन ठेवलेले आहे. आमची दारे त्या सगळ्यांसाठी उघडी आहेत, असे ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!