It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

भाजपचे ‘नरेंद्र मोदी एक्स्परिमेंट’ जनतेने स्वीकारले : अमित शहा

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. पाच वर्षांत सरकारने १३३ योजना आणल्या आणि त्या तळागाळापर्यंत पोहचवल्या. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देत या सरकारने वाटचाल केली. भाजपचा हा ‘नरेंद्र मोदी एक्स्परिमेंट’ जनतेने स्वीकारला आहे आणि यापुढेही हा प्रयोग जनता स्वीकारणार आहे. त्यामुळेच गेल्यावेळेपेक्षा मोठ्या बहुमताने केंद्रात पुन्हा एकदा ‘मोदी सरकार’ येणार आहे, असा विश्वास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार व्यक्त परिषदेत केला. भ्रष्टाचार आणि महागाई हे मुद्दे प्रचारात नाहीत, अशी ही पहिलीच निवडणूक असल्याचा दावाही शहा यांनी केला. या पत्रकार परिषदेला नरेंद्र मोदीही उपस्थित होते.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्ली मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत भाजपची प्रचाररचना, मोदी सरकारची कामगिरी, पश्चिम बंगालमधील संघर्ष यासह विविध मुद्द्यांवर शहा यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या दृष्टीने स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक आव्हानात्मक अशी ही निवडणूक होती. प्रचंड मेहनत करावी लागली. प्रचाराचा आवाका खूप मोठा होता. प्रचाराची एकंदर व्याप्ती व त्याला जनतेचा मिळालेला प्रतिसाद पाहता मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार ही आमची खात्री आहे. प्रचारात भाजप कार्यकर्त्यांपेक्षा जनताच आघाडीवर होती आणि ‘फिर एक बार’ नव्हे तर ‘बार बार मोदी सरकार’ अशा घोषणा आता जनता देऊ लागली आहे, असे शहा म्हणाले. भाजपसाठी निवडणूक हा लोकशाहीचा एक महोत्सवच असतो. यंदा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात दौरा केला. २८ मार्च रोजी उत्तर प्रदेशातील मेरठमधून प्रचाराचा धडाका सुरू झाला होता, तो आज मध्य प्रदेशात थांबला. यादरम्यान मोदींनी १४२ जाहीर सभा घेतल्या आणि ४ रोड शो केले. मोदींच्या या प्रचारयात्रेला १ कोटी ५० लाख लोकांचा प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यांदरम्यान मोदींनी भाजपच्या १० हजार कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मोदींनी एका दिवसात पाचपेक्षाही अधिक सभा घेतल्या. तीन दिवसांत त्यांनी ४ हजार किलोमीटरचा प्रवास केला. १८ अंश सेल्सियसपासून ते ४६ अंश सेल्सियसपर्यंतच्या तापमानात पंतप्रधानांनी सभा घेतल्या. तापमान कितीही असलं तरी जनतेचा उत्साह मात्र ५० अंश सेल्सियसच्यापुढेच सळसळणारा होता, असे शहा म्हणाले.

भाजप यंदा ३००चा आकडा पार करेल आणि एनडीएतील अन्य घटक पक्षांना सोबत घेऊन आम्ही पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहोत, असा विश्वास शहांनी व्यक्त केला. एनडीए सरकारच्या धोरणांचा स्वीकार करून आणखी कुणी आमच्यासोबत येणार असेल तर त्याचं स्वागतच आहे, असेही शहा एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. पश्चिम बंगाल, ओरिसा तसेच दक्षिणेकडे भाजपच्या जागा वाढतील. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांत गेल्यावेळेपेक्षा स्थिती चांगली राहील, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार झाला त्याला ममता बॅनर्जीच जबाबदार आहेत, असा आरोप शहा यांनी केला. तिथे दीड वर्षांत भाजपचे ८० कार्यकर्ते मारले गेले आहेत. त्यावर ममतांकडे काय उत्तर आहे?, असा सवाल शहा यांनी केला. आम्ही देशभरात निवडणूक लढत आहोत. पश्चिम बंगाल सोडून अन्यत्र कुठेही हिंसाचार झालेला नाही, हे का?, याचे उत्तर ममतांनीच द्यायला हवे. याबाबत पत्रकारांनीही त्यांना विचारायला हवे, असे शहा म्हणाले.

दिल्लीत केबिनमध्ये दोन नेते भेटले व त्यांनी एकजूट दाखवली म्हणून जनता त्यांच्यामागे जाईल, हे आता विसरायला हवे. जनता आज सुज्ञ बनली आहे, असा टोला शहा यांनी विरोधकांना लगावला. मैदानात काही काम उरले नसल्याने आता विरोधकांनी बैठकीचं नियोजन केलं आहे, असा चिमटाही शहा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात काढला.

राफेल कराराबाबत प्रश्न विचारला असता राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाला सहकार्य करायला हवे होते, असे शहा म्हणाले. राफेल करारात कोणतीही तडजोड वा कुणालाही झुकतं माप देण्यात आलेलं नाही. या करारात एका पैशाचाही भ्रष्टाचार झालेला नाही, असा दावा शहा यांनी केला.