Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप खासदाराने नथुरामची राजीव गांधी आणि कसाबशी केली तुलना…तर हेगडे म्हणाले तो मी नव्हेच !!

Spread the love

राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर टीका झाल्यानंतर आता भाजपाचे खासदार पुन्हा वादात सापडले आहेत. भाजपा खासदार नलीन कुमार कतील यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींची तुलना गोडसेशी केली आहे. ‘गोडसेनं एकाला मारलं. कसाबनं ७२ जणांची हत्या केली. राजीव गांधींनी १७हजार जणांना मारलं. आता तुम्हीच ठरवा अधिक क्रूर कोण,’ असं कतील यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यावरुन कतील यांच्यावर सोशल मीडियानं जोरदार टीका केली. यानंतर लगेचच कतील यांनी ट्विट डिलीट केलं. ‘माझ्या ट्विटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माफी मागतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. अनेकांनी त्यावर आक्षेप घेताच मी ट्विट हटवलं. आता यावरील चर्चा थांबवू या,’ असं नवं ट्विट कतील यांनी केलं.

नलीन कतील दोन वेळा भाजपाकडून लोकसभेवर गेले आहेत. दक्षिण कन्नडा मतदारसंघातून ते निवडून गेले. कतील यांच्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर टीका केली होती. ‘काँग्रेसच्या दरबारातली नेतेमंडळी राजीव गांधींना मिस्टर क्लीन म्हणून गाजावाजा करायची. पण नंबर भ्रष्टाचारी म्हणून त्यांचं आयुष्य संपलं,’ अशा शब्दांत मोदींनी राजीव गांधींवर टीका केली होती. राजीव गांधींनी आयएनएस विराटचा स्वत:च्या कुटुंबासाठी टॅक्सीसारखा वापर केला, असा दावादेखील त्यांनी केला होता.

राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं काल भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या. यानंतर भाजपानं त्यांना माफी मागण्याची सूचना केली. यानंतर सिंह यांनी माफीदेखील मागितली. मात्र गोडसेबद्दलच्या विधानाबद्दल केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी साध्वीचं समर्थन केलं. या प्रकरणी माफीपासून पुढे जायला हवं. आपण आता पुढे जाणार नाही, तर केव्हा जाणार?, असं ट्विट हेगडेंनी केलं.

दरम्यान साध्वी प्रज्ञा यांच्या नथुराम गोडसेचे कौतुक करणाऱ्या विधानाचे समर्थन करणारे भाजप नेते अनंत कुमार हेगडे आपल्या विधानावरून पलटले आहेत. माझं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं आणि नथुराम गोडसेंचं समर्थन करणारी पोस्ट मी लिहिली नव्हती असा निर्वाळा हेगडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. भाजपने या सर्वांना आता कारणे  दाखवा नोटीस बजावल्या असून दहा दिवसात खुलासा  करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!