लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच सोनियांनी बोलावली भाजपाविरोधी आघाडीची बैठक

Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी एनडीएत सहभागी नसलेल्या पक्षांची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे २३ मे रोजी मतमोजणीच्या दिवशी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

सोनिया गांधी यांनी धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टॅलीन, राष्ट्रीय जनता आणि तृणमूल काँग्रेसचा समावेश आहे. या साठी काँग्रेसच्या चार वरिष्ठ नेत्यांची एक टीम बनवण्यात आली आहे. ही टीम सर्व प्रमुख नेत्यांशी समन्वय साधून त्यांचे मुद्दे जाणून घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या टीममध्ये अहमद पटेल, पी. चिदम्बरम, गुलाम नबी आझाद आणि अशोक गेहलोत यांचा समावेश आहे. हे नेते समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलणी करून आघाडीसाठी प्रयत्न करतील, असं सूत्रांनी सांगितलं.

सत्ता स्थापनेची कुठलीही संधी काँग्रेसला गमवायची नाहीए. यामुळे काँग्रेसने इतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांना गळ घालण्याची तयारी सुरू केली आहे. यात तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा समावेश आहे. तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी राव यांनी अलिकडेच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि द्रमुकचे प्रमुख एम.के. स्टॅलीन यांची भेट घेतली होती. चंद्रशेखर राव आणि वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांना काँग्रेसने निमंत्रित केल्याचं वृत्त आहे. मात्र, या वृत्ताबाबत अद्याप खात्री पटलेली नाही.

भाजपला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळणार नाही, असा काँग्रेसला ठाम विश्वास आहे. तसंच त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्यास भापला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केलेत. यामुळेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलंय. ‘लोकसभा निकालानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास आम्ही पंतप्रधानपदही सोडायला तयार आहोत. आघाडी सरकारमध्ये आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळालं तरी काहीच अडचण नाही,’ असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply