Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

फेसबुकवर ब्राह्मण आणि हिंदू धर्माविरोधातीळ पोस्ट शेअर केली म्हणून विक्रोळीतील डॉक्टरला अटक

Spread the love

फेसबुकवर ब्राह्मण आणि हिंदू धर्माविरोधात पोस्ट शेअर करणाऱ्या डॉक्टरला विक्रोळी पार्कसाइट पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. सुनीलकुमार निशाद असे या डॉक्टरचे नाव असून त्याने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधातही पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणी आयपीसी कलम 295 (A) अंतर्गत डॉ. सुनील कुमार निषाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

विक्रोळीत राहणाऱ्या रविंद्र तिवारी यांनी शनिवारी विक्रोळी पार्कसाइट पोलिसांकडे तक्रार दिली होती. डॉ. सुनीलकुमार निशाद हे फेसबुकवर हिंदू धर्म आणि ब्राह्मणांविरोधात पोस्ट टाकत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी या आधारे गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. अखेर बुधवारी पोलिसांनी डॉ. निशाद याला अटक केली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला होता. अखेर निशादला मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसजवळून अटक करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी दिली. निशाद हा होमिओपॅथी डॉक्टर असून मुंबईतील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज देण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

रविंद्र तिवारी यांनी सांगितले की, मी आणि डॉ. निशाद एकाच परिसरात राहतो. गेल्या दोन वर्षांपासून ते सातत्याने ब्राह्मण आणि हिंदू धर्माविरोधात पोस्ट शेअर करत आहेत. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. एखाद्या धर्माविषयी किंवा व्यक्तीविषयी तक्रार असेल तर पोलिसांची मदत घ्यावी, पण सोशल मीडियावर अशा गोष्टी पोस्ट करु नये असे त्यांना सांगितले. पण त्यांनी पोस्ट करणे सुरुच ठेवल्याने आम्ही शेवटी पोलिसांकडे तक्रार केली, असे तिवारी यांनी म्हटले आहे. डॉ. निशादच्या फेसबुक प्रोफाइलवर ‘बामसेफ’चे सदस्य असल्याचे म्हटले आहे. ‘बामसेफ’ची स्थापना बहुजन समाज पक्षाचे कांशीराम यांनी केली होती. निशादने फेसबुकवर मोदी, भाजपा आणि प्रज्ञासिंह यांच्यावर टीका करणारे पोस्ट देखील केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!