Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या अपर पोलीस महासंचालकपदी देवेन भारती

Spread the love

राज्य सरकारने अपर पोलीस महासंचालक आणि विशेष महानिरीक्षक पदाच्या १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस देवेन भारती यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांच्याकडे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

देवेन भारती हे गेले महिनाभर आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त म्हणून कारभार पाहत होते. कायदा आणि सुव्यवस्था सहपोलीस आयुक्तपदावर सर्वाधिक चार वर्षे काम करणारे भारती एकमेव अधिकारी आहेत. गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देखील त्यांनी जवळपास पाच वर्षे सांभाळली होती. पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असलेले देवेन भारती अतिरिक्त पोलिस महासंचालक या पदावर बढतीसाठी जानेवारी २०१९ पासूनच पात्र होते.

दहशतवादविरोधी पथकाचे विद्यमान अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. पुण्याचे अपर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांची मुंबईत बदली झाली आहे. मुंबईत अपर पोलीस महासंचालकपदी असलेल्या डॉ. प्रज्ञा सरवदे यांची पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित विभागाच्या प्रमुख पदी बदली करण्यात आली आहे.
आशुतोष डुंबरे यांनाही बढती
गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनाही बढती देण्यात आली असून ते आता मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहतील. फोर्स वनचे विशेष पोलीस महासंचालक हे पद उन्नत करून अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन असे करण्यात आले आहे, सध्याचे फोर्स वनचे प्रमुख डॉ. सुखविंदर सिंह यांना या नव्या अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन पदावर बढती मिळाली आहे. देवेन भारती यांची एप्रिल २०१५ मध्ये मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. लोकसभा निवडणूका जाहीर होताच एकाच पदावर तीन वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. पण भारती यांचा सक्षम अनुभव लक्षात घेता त्यांना या आदेशातून वगळण्यासाठी राज्य सरकारने खूप प्रयत्न केले. सरकारची विनंती मान्यही करण्यात आली. पण निवडणुकीच्या वेळी पुन्हा निवडणूक आयोगाने बदलीचे आदेश दिल्याने भारती यांना त्यावेळी तूर्त आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!