Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पश्चिम बंगाल : रोड शोच्या वेळी झालेल्या हिंसाचारावरून भाजप – टीएमसी यांच्यात आरोप प्रत्यारोप

Spread the love

काल भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उत्तर कोलकाता येथील रोडशोमध्ये भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले  आहे. भाजप कार्यकर्त्यांमुळेच गदारोळ झाला असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तर  तृणमूल काँग्रेसने केलेल्या हिंसाचाराविरोधात निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे.

सातव्या टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मंगळवारी संध्याकाळी शहा यांच्या रोडशोवर लाठीहल्ला करण्यात आला. यानंतर भाजप-तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या रोडशोवर कुठे दगडफेक करण्यात आली तर कुठे रस्त्यावरच आग लावून रोड शोचा निषेध करण्यात आला. तर अखेर महान समाजसेवक पंडित इश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली.

या प्रकाराबद्दल अमित शहा यांनी ममता बॅनर्जीं आणि तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. तर या सगळ्या प्रकारामागे भाजपचाच हात आहे अशी टीका ममता बॅनर्जींनी केली आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसने एक व्हिडिओही जाहीर केला असून या व्हिडिओमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक आगपोळ करताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या साहाय्याने तृणमूल काँग्रेसकडून भाजपवर हिंसाचार केल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपनेही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हाणामारी करतानाचा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. अमित शहा यांनी आज सकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन तृणमूलच्या हिंसाचाराची दखल निवडणूक आयोगाने घ्यावी अशी मागणी केली आहे. तसेच ममता बॅनर्जी लोकशाहीचे हनन करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

बंगालचे थोर समाजसेवक पंडित इश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची नासधूस भाजप समर्थकांने केल्याचा आरोप करण्यात येतो आहे . या मूर्तीची तोडफोड केल्याचा व्हिडिओ तृणमूलने जाहीर केला आहे. तर अमित शहांनी हे आरोप फेटाळले आहेत. याप्रकरणी अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. भाजपने इश्वरंद्रांच्या मूर्तीची नासधूस करून बंगाली लोकांचा आणि पश्चिम बंगालचाच अपमान केला असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!