या निवडणुकीत मोदींचं जहाज बुडत आहे, संघानेही भाजप आणि मोदींची साथ सोडलीय : मायावती

Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्यावर व्यक्तिगत टीका केल्यानंतर बसपा अध्यक्षा मायावती यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. या निवडणुकीत मोदींचं जहाज बुडत आहे. त्यांचं राजकारणही संपुष्टात आलंय. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यांची आणि भाजपची साथ सोडलीय, असा दावा मायावती यांनी केला आहे.  मायावती यांनी त्यांच्या ट्विटरवरून ट्विट करत पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मोदींनी देशवासियांना मोठी आश्वासनं दिली होती. ही आश्वासनं त्यांनी पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाल्याने संघाने भाजपपासून स्वत:ला दूर केलं आहे. त्यामुळेच या संपूर्ण निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक भाजपसाठी मतं मागताना दिसत नाहीत. यावरून मोदींचं राजकारण संपुष्टात आल्याचं अधोरेखित होतंय, असं मायावती यांनी स्पष्ट केलं आहे.

जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना देशाने सेवक, मुख्यसेवक, चहावाला आणि चौकीदारच्या रुपात पाहिले आहे. आता देशाला संविधानावर आधारित कल्याणकारी राज्य चालविण्याची मानसिकता असलेला पंतप्रधान हवाय. जनतेची आजवर खूप फसवणूक झालीय. आता ते फसणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.  दरम्यान रोड शो आणि ठिकठिकाणी पूजाअर्चा करण्याची सध्या फॅशन आली आहे. त्यावर निवडणुकीत भरपूर खर्च केला जातो. त्यामुळे निवडणूक आयोगानं रोड शोचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात पकडावा, अशी मागणीही त्यांनी केली. आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे निवडणूक प्रचारबंदी घालण्यात आलेला उमेदवार मंदिरात पूजा करण्यासाठी जातो. त्यावेळी मीडियाकडून त्याला मोठी प्रसिद्धी दिली जाते. मीडियाकडून देण्यात येणाऱ्या प्रसिद्धीवर बंदी घालण्यासाठी निवडणूक आयोगाने काही तरी उपाय योजना करायला हवी, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

Leave a Reply