Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

फोटोशॉपवर केला ममता बॅनर्जींचा ‘मेट गाला’ अवतार, भाजप नेत्या प्रियांका शर्मा यांना अखेर चार दिवसानंतर जामीन

Spread the love

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो मॉर्फ करून मीम बनविणाऱ्या भाजपनेत्या प्रियांका शर्मा यांना अखेर जामीन चार दिवसानंतर मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधी प्रियांकांना माफी मागा तरच जामीन मिळेल असे निर्देश दिले होते. परंतु नंतर आपल्या या आदेशात बदल करून प्रियांका यांना तात्काळ जामीन मंजूर केला. ममता दीदींचं मीम बनविल्याप्रकरणी प्रियांका यांना अटक करण्यात आली होती.

सुनावणी सुरू झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने प्रियांका शर्मा यांना तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ममता बॅनर्जी यांची जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले होते. मात्र नंतर कोर्टाने प्रियांका यांचे वकील एनके कौल यांना बोलावून घेतले आणि आपल्या आदेशात फेरबदल करत माफी मागण्याची अट काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं. चार दिवसानंतर जामीन मिळाल्याने प्रियांका यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जामीन नाकारला गेल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात संदेश जाऊ शकतो. तसेच माफी मागण्याचे आदेश म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखच आहे, असं कौल यांनी प्रियांका यांची बाजू मांडताना कोर्टात स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयावर प्रियांका शर्मा यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. शर्मा कुटुंबीयांनी मिठाईचं वाटप करून आनंद साजरा केला. प्रियांका शर्मा यांनी ममता बॅनर्जी यांचा फोटो फोटशॉप्ड केला होता. अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या मेट गाला लुक सारखाच ममता दीदींचा फोटो बनविण्यात आला होता. त्यामुळे संतापलेल्या टीएमसी कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी प्रियांका शर्मांना अटक केली होती. त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!