या निवडणुकीत ‘रालोआ’ला दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा मिळतील : राजनाथ सिंह यांना विश्वास

Advertisements
Spread the love

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जिंकलेल्या जागांपेक्षा अधिक जागा या निवडणुकीत जिंकू. तसेच ‘रालोआ’ला दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. तसेच विरोधी पक्षांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नावही जाहीर करण्यात यावे, असे आव्हानच त्यांनी विरोधकांना दिले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा या निवडणुकांमध्ये मिळतील या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलो असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. तसेच रालोआला दोन तृतीयांश बहुमताची शक्यताही नाकारता येणार नाही. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ज्या आशा होत्या त्या आता आत्मविश्वासात बदलल्या असल्याचे ते म्हणाले.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी विरूद्ध सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह असा सामना रंगला होता. परंतु यावेळी नरेंद्र मोदी विरूद्ध कोण आहे याची अद्याप कोणतीही माहिती विरोधकांकडून देण्यात आली नाही. विरोधकांनी जनतेला अंधारात न ठेवता आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल हे जाहीर करावे, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावरूनही काँग्रेसला घेरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ही नीच वृत्तीचे असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी आपले वक्तव्य योग्य असल्याचे म्हटले होते. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देण्याची मागणीही केली.

Leave a Reply