उत्तर प्रदेश पोलिसांचे लज्जास्पद वर्तन : विधवेची परवड , आधी विकले ,सामूहिक बलात्कार , पोलिसांनीही हाकलले मग तिने घेतले जाळून

Advertisements
Spread the love

उत्तर प्रदेशात एका विधवा महिलेच्या शोषणाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विशीतील या महिलेच्या नवऱ्याचे निधन झाल्यानंतर तिच्या वडिलांनी पीडित महिलेची १० हजार रुपयांना विक्री केली. ज्याने या महिलेला विकत घेतले त्याने आणि त्याच्या मित्रांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा या महिलेने मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली तेव्हा पोलिसांनी सुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष केले. सर्व बाजूंनी झालेल्या शोषणामुळे त्रासलेल्या या महिलेने अखेर मागच्या महिन्यात स्वत:ला पेटवून घेतले. ही महिला ८० टक्के भाजली असून दिल्लीच्या खासगी रुग्णालयात तिचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातील हापूर येथे रहाणाऱ्या या महिलेची नवऱ्याच्या निधनानंतर विक्री करण्यात आली. ज्याने या महिलेला विकत घेतले त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड म्हणून तो या महिलेला त्यांच्याकडे घरकामासाठी पाठवायचा. तिथे या महिलेला प्रचंड त्रास दिला गेला. तिच्यावर बलात्कार करण्यात आला. उत्तर प्रदेश पोलिसांनी आता या प्रकरणाची दखल घेऊन तपास सुरु केला आहे. बलात्काराच्या वेगवेगळया कलमातंर्गत १४ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे अशी माहिती हापूरचे एसपी यशवीर सिंह यांनी रविवारी दिली.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांचे वर्तन अत्यंत लाजिरवाणे असून त्यांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे पीडित महिलेने स्वत:ला पेटवून घेतले असे दिल्ली महिला आयोगाच्या पत्रात म्हटले आहे. पोलीसही तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे महिलेने २८ एप्रिलला स्वत:ला पेटवून घेतले. स्वाती मालिवाल यांनी आपल्या पत्रात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पीडित महिलेला योग्य ती नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे. हापूर पोलिसांच्या चौकशीची सुद्धा मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply