अ‍ॅड. प्रेमानंद रूपवते यांच्या पत्नी कार अपघातात ठार , चालकासह अन्य तीन जखमी

Advertisements
Spread the love

कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात बांद्रा येथील चेतना इन्स्टिट्यूटच्या संचालिका स्रेहजा प्रेमानंद रुपवते (६५, मुंबई) यांचा मृत्यू झाला. यात चालकासह अन्य तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना  जळगावजवळच्या पाळधी येथे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. मातृदिनाच्या दिवशीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने रुपवते कुटुंबीय, चौधरी कुटुंबीय आणि त्यांच्या सर्व परिचितांमध्ये या वृत्तामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

स्नेहजा या विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या कन्या व दादासाहेब रुपवते यांच्या सून तसेच रावेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी होत्या. रावेर येथे रविवारी शिरीष चौधरी यांच्या मुलीचे लग्न होते. हे लग्न आटोपून त्या मुंबईकडे जात असताना  हा अपघात झाला. यात चालकासह अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

स्नेहजा रुपवते या काँग्रेस नेते व बहुजन शिक्षण संघ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त दिवंगत अ‍ॅड. प्रेमानंद रूपवते (७३) यांच्या पत्नी होत्या. त्यांच्यामागे आई सुशीलाबाई, मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे अ‍ॅड. संघराज, वैमानिक परित्याग व संग्राम असे तीन भाऊ, बहिणी अ‍ॅड. युगप्रभा बल्लाळ, डॉ. स्मृतिगंधा गायकवाड व डॉ. क्रांती कोळगे, मुली उत्कर्षा व बंधमुक्ता, जावई, मेहुणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

कुसुमताई चौधरी महिला कल्याणी आणि बहुजन शिक्षण संघ यांच्या माध्यमातून त्यांनी हजारो समस्याग्रस्त,वंचित व उपेक्षित मुलींचे शिक्षण केले,तसेच शिक्षणानंतर त्या मुलींना रोजगार,सामाजिक सुरक्षा देण्याचे जे रचनात्मक काम केले त्याला तोड नाही. स्नेहजाताई उत्तम साहित्यिक होत्या,सर्व प्रकारच्या साहित्याचा त्यांचा अभ्यास होता.त्यांचे लग्न आंतर जातीय तर होतेच पण ते लग्न म्हणजे गांधी आंबेडकर विचार हातातहात घालून एकत्र वाटचाल करू शकतात याचा वस्तुपाठ होता. समाजापुढे तो एक आदर्श होता, अशा शब्दात हिरालाल पगदल यांनी स्नेहाजाताईंना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Leave a Reply