उत्तर प्रदेशातील तरुणाची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या

Spread the love

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून एका तरुणाने उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisements

पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय सारस्वत (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश गाजियाबादचा रहिवासी होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून तो राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. त्याचे कुटुंबीय सर्वत्र त्याचा शोध घेत होते. दरम्यान, अक्षयने शनिवारी आपल्या नातेवाईकांना मुंबई विमानतळावरील टर्मिनस-२ या ठिकाणी संध्याकाळी बोलावून घेतले आणि त्यांच्या समोरच विमानतळाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असेही त्याने सुसाईड नोटमध्ये लिहीले आहे.

अक्षय हा उच्चशिक्षित होता, तो गेल्या दोन वर्षांपासून मानसिक तणावाखाली होता तसेच तो दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश येथून मुंबईत आला होता. मात्र, या तणावातूनच त्याने आत्महत्या केली की आणखी दुसरे काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

आपलं सरकार