It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

प्रवीण परदेशी मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त

Spread the love

अजोय मेहता यांच्यानंतर मुंबईचा नवा आयुक्त कोण?, या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले असून मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच प्रवीण परदेशी हे त्यांचे उत्तराधिकारी असतील, याला अधिकृत दुजोरा मिळाला आहे.

Advertisements

मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी प्रवीण परदेशी यांच्यासह विक्रीकर आयुक्त राजीव जलोटा, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव आणि एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांची नावे चर्चेत होती. मात्र, यात प्रवीण परदेशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रवीण परदेशी हे १९८५च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. परदेशी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाआधी वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास व महसूल अशा विविध विभागांत जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. १९९३मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते. तेव्हा त्यांनी जो कामाचा धडाका दाखवला होता त्याची मोठी प्रशंसा झाली होती. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेचच परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आणले होते. परदेशी यांच्यावर फडणवीस यांनी नेहमीच विश्वास दाखवला.