Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदी केवळ मतांसाठी मागास म्हणवून घेत असल्याची मायावती यांची टीका

Spread the love

नरेंद्र मोदी जर खरोखर मागास जातीचे असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना पंतप्रधान होऊच दिले नसते. राजकीय स्वार्थासाठी आपण मागास जातीचे असल्याचं ढोंग मोदी करत आहेत असा घणाघात बसपा प्रमुख मायावती यांनी केला आहे. सपा-बसपा महाआघाडीवर केलेल्या जातीयवादाच्या टीकेला मायावती यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

उत्तर प्रदेशात अनेक महत्त्वाच्या जागांवर १२ मेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या बहुतांश सभांमध्ये सपा-बसपा महाआघाडीला लक्ष केलं आहे. सपा-बसपाची महाआघाडी जातीयवादाचे राजकारण करतं आहे असा आरोप मोदींनी केला होता. आता याच आरोपाला मायावतींनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

‘सपा-बसपा जातीयवादाचे राजकारण करत आहेत असं म्हणणं हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे. ज्यांनी जातीयवादाचे चटके सोसले आहे ते त्याचं राजकारण कसं करतील? जातीयवादाची झळ कधी मोदींना लागलेली नाही. त्यामुळेच ते अशी विधानं करू शकतात’.अशी टीका मायावती यांनी केली आहे.

तसंच मोदी काही मागास जातीचे नाहीत. पण मतांसाठी ते स्वत:ला मागास म्हणवत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. ‘मोदी जर खरोखर मागास असते तर संघाने त्यांना पंतप्रधान केलंच नसतं. कल्याण सिंह यांची भाजपने काय दशा केली हे सगळ्यांनाच माहित आहे.’ कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशात लोधी समाजाचे नेते असून ही एक अत्यंत मागास जात आहे. आता मोदी या टीकेचे कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!