ईव्हीएम मशीन बाबत चिंता वाटते , घड्याळाचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पाहिलं आहे : शरद पवार

Advertisements
Spread the love

घड्याळाचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पाहिलं आहे त्यामुळे मला ईव्हीएम मशीन बाबत चिंता वाटते असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. हैदराबाद आणि गुजरात या ठिकाणची काही ईव्हीएम मशीन लोकांनी माझ्यासमोर ठेवली आणि मला बटण दाबण्यास सांगितलं. मी घड्याळासमोरचं बटण दाबलं आणि कमळाला मत गेलं. हा प्रकार मी माझ्या डोळ्यानं पाहिला आहे असं शरद पवार यांनी साताऱ्यात म्हटलं आहे. साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच कार्यक्रमात शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनबाबत चिंता व्यक्त केली.

असं असलं तरीही सगळ्याच ईव्हीएम मशीनमध्ये अशा प्रकारचा बिघाड असेल असं माझं म्हणणं नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. हा सगळा प्रकार आम्ही कोर्टासमोरही आणला. मात्र आमचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलं नाही अशीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही VVPAT मशीमधल्या चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली होती. यापूर्वीच्या मतदानात सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या जायच्या त्या आताच्या चिठ्ठ्यांपेक्षाही मोठ्या होत्या असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी म्हणणं गैर आहे असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. एखादा माणूस हयात नसताना त्याबद्दल अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. राजीव गांधी यांचा मृत्यू क्लेशदायक होता. गांधी कुटुंबातले दोन पंतप्रधान या देशात होऊन गेले. दोघांचीही क्रूरपणे हत्या करण्यात आली. एवढा मोठा त्याग त्या कुटुंबाने केला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलत आहेत ती भाषा त्यांना शोभणारी नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे

Leave a Reply