ममता दीदींनी माझ्या थोबाडात मारली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद: मोदी

Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आज पुरुलिया येथील सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीयांच्यावर जोरदार हल्ला चढवला. दीदींनी माझ्या थोबाडात मारली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल, असं मोदी म्हणाले. मोदी यांनी पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे प्रचार सभा घेतली. त्यात त्यांनी ममता बॅनर्जींवर हल्ला चढवला. ‘मला सांगितलं गेलं की दीदींना मोदींच्या कानाखाली मारायची आहे. ममता दीदी, मी तर तुम्हाला दीदी म्हणतो. तुमचा आदर करतो. तुम्ही मुस्कटात मारली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल. तेही सहन करीन,’ असं म्हणत मोदींनी ममतांवर प्रतिहल्ला केला.

दरम्यान, ममतांनी काही दिवसांपूर्वी प्रचार सभेत मोदींवर टीका केली होती. ‘मोदींनी पाच वर्षांत अच्छे दिन आणण्याच्या गोष्टी केल्या होत्या. परंतु, नंतर त्यांनी नोटाबंदी केली. ते राज्यघटनासुद्धा बदलणार आहेत. भाजपच्या घोषणांवर माझा तिळमात्र विश्वास नाही. पैसा माझ्यासाठी सर्व काही नाही. मात्र, मोदी जेव्हा पश्चिम बंगालमध्ये येतात आणि तृणमूल काँग्रेस लुटारूंचा पक्ष असल्याचा आरोप करतात तेव्हा संताप होतो. यंदाच्या निवडणुकीत लोकशाहीमध्ये अर्थातच मतदारांकडून त्यांना सणसणीत मुस्कटात बसली पाहिजे,’ असे ममता म्हणाल्या होत्या. ‘भाजप पराभूत झाला तर खुद्द मोदींनाच चपराक बसल्यासारखे होईल,’ असेही त्या म्हणाल्या होत्या.