Waranasi : तेजबहादूर यादव उमेदवारी रद्द प्रकरणी निवडणूक आयोगाला नोटीस

Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरलेले सीमा सुरक्षा दलाचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने बुधवारी नोटीस बजावली.

तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी १ मे रोजी फेटाळला होता. याविरोधात तेजबहादूर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणात गुरुवारपर्यंत उत्तर द्यावे, असे कोर्टाने म्हटले आहे.

अर्ज का बाद करण्यात आला होता ?
तेजबहादूर यांनी २४ एप्रिल रोजी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात सीमा सुरक्षा दलातून बडतर्फ करण्यात आल्याचा उल्लेख केला होता. मात्र, समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी २९ एप्रिलला दाखल केलेल्या अर्जात हा उल्लेख केलेला नाही. तसेच त्यांना सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) बडतर्फ करण्यात आल्याची कारणे नमूद करणारे ‘बीएसफ’चे ना-हरकत प्रमाणपत्र त्यांनी अर्जासोबत जोडणे आवश्यक होते. तेजबहादूर यांच्या उमेदवारी अर्जातील विसंगती आणि त्रुटीबाबत १ मे रोजी निवडणूक अधिकाऱ्यांपुढे सुनावणी झाली. त्यावेळी त्यांचा अर्ज बाद करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते.

Leave a Reply