हिंमत असेल तर दोन कोटी रोजगारांच्या आश्वासनांवर मते मागण्याचे मोदींना आव्हान

Advertisements
Spread the love

काँग्रेसला राजीव गांधींच्या नावावर निवडणूक लढवा, असं आव्हान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता काँग्रेस नेते हार्दिक पटेलयांनी प्रति आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर २ कोटी रोजगारांच्या आश्वासनांवर मतं मागा, असं आव्हान हार्दिक पटेल यांनी मोदींना दिलं. ते भोपाळमध्ये बोलत होते.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचा संदर्भ देत हार्दिक पटेल यांनी मोदींना थेट आव्हान दिलं. तुमच्याच हिंमत असेल तर २ कोटी रोजगारांच्या आश्वासनावर मतं मागा, असं पटेल म्हणाले. उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य करताना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींवरदेखील टीका केली होती. त्यावेळी त्यांनी राजीव गांधींचा उल्लेख भ्रष्टाचारी नंबर वन असा केला होता. मोदींच्या याच टीकेला हार्दिक पटेल यांनी उत्तर दिलं.

मृत व्यक्तीबद्दल वाईट बोलणं आपल्या संस्कृतीत बसत नाही, असं हार्दिक पटेल म्हणाले. ‘मोदी उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या सभेत राजीव गांधींना भ्रष्टाचारी नंबर वन म्हणाले. मोदींनी भाषणाच्या आवेशात ते विधान केलं असं मला वाटलं होतं. मात्र त्यानंतरच्या सभांमध्येही मोदींनी त्याची पुनरावृत्ती केली,’ असं पटेल यांनी म्हटलं. राजीव गांधींनी देशात दूरसंचार क्रांती घडवली. त्यांच्याविषयी मोदींनी असं विधान करणं दु:खदायक आहे. मोदींकडे त्यांच्या कामाबद्दल बोलण्यास काहीच नसल्यानं ते अशी वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली.