विरोधी पक्षांची २१ मे रोजी दिल्लीत बैठक , राहुल आणि चंद्राबाबू यांच्यात प्राथमिक चर्चा

Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधींच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली आहे. दरम्यान, विरोधी पक्षांची २१ मे रोजी दिल्लीत  एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चंद्राबाबू यांनी राहुल गांधींची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांच्या भेटीनंतर ते ममता बॅनर्जी यांना भेटणार आहेत.

२३ मे नंतरची रणनीती आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे वृत्त हिंदूने दिले आहे.

राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यामध्ये १० ते १५ मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत निवडणुकांनंतरच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? या प्रश्नावरून भाजपकडून विरोधकांना टार्गेट करण्यात येतं. त्यामुळे आता पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची २१ मे रोजी दिल्लीत बैठक होणार आहे.

भाजपविरोधी आघाडीच्या या बैठकीत पंतप्रधानपदाच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. याबाबत चंद्राबाबू नायडू यांनी माहिती दिली आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी, बसपा अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव, शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.