श्रीलंकेतून ६०० परदेशी नागरिकांसह २०० मुस्लिम धर्मगुरूंना त्यांच्या मायदेशी पाठवले

Advertisements
Spread the love

श्रीलंकेत ईस्टर संडेदिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमागे स्थानिक जिहादी गटाचा हात असल्याचे समोर आल्यानंतर, श्रीलंकेने व्हिसाची मुदत उलटून गेलेल्या परदेशी नागरिकांवर कारवाई तीव्र केली आहे. श्रीलंकेतून ६०० परदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले असून यामध्ये २०० मुस्लिम धर्मगुरूंचाही समावेश आहे.

श्रीलंकेचे गृहमंत्री वजिरा अबेवर्देना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांनी कायदेशीर मार्गांनी श्रीलंकेत प्रवेश केला होता. मात्र बॉम्बस्फोटांनंतर सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या कारवाईत व्हिसाची मुदत उलटून गेल्यानंतरही ते देशात राहत असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना दंड ठोठावत त्यांची देशाबाहेर पाठवणी करण्यात आली.

सध्या व्हिसा प्रणालीचा फेरआढावा घेण्याची प्रक्रिया सुरू असून धर्मगुरूंसाठी व्हिसा नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ईस्टर संडेदिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत २५७ जण मृत्युमुखी पडले होते, तर ५०० हून अधिक व्यक्ती जखमी झाल्या होत्या.

बॉम्बस्फोटांनंतर तब्बल दोन आठवड्यांनी आज, सोमवारी श्रीलंकेतील शाळा पुन्हा उघडणार आहेत. बॉम्बस्फोटांनंतर पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, श्रीलंकेतील कॅथलिकधर्मीयांनी बॉम्बस्फोटांनंतर दुसऱ्या रविवारीही टीव्हीच्या माध्यमातून आपापल्या घरांतून रविवारची प्रार्थना केली. कोलंबोचे आर्चबिशप माल्कम रणजीत यांनी आपल्या निवासस्थानाहून टीव्हीच्या माध्यमातून प्रार्थना केली.