मारुती सुझुकीबरोबर टाटा मोटर्सकडूनही लहान डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याची घोषणा

Advertisements
Spread the love

मारुती सुझुकीने डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता टाटा मोटर्सनेदेखील आपल्या लहान डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे.बीएस-६ मानक लागू झाल्यानंतर डिझेलच्या छोट्या तसेच मध्यम कार महाग होतील. या कारच्या मागणीचा विचार करता या प्रकारच्या पेट्रोल कारनाच अधिक मागणी आहे. भारतात १ एप्रिल २०२० पासून बीएस-६ प्रदूषण मानक लागू होत असून यामुळे अनेक कंपन्यांच्या डिझेल वाहनांमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे या कार महाग होऊ शकतात.

या पार्श्वभूमीवर अशा कारची मागणीही कमी होऊ शकते. परिणामी पुढील वर्षापासून टाटा मोटर्स छोट्या डिझेल कारचे उत्पादन बंद करणार आहे, अशी माहिती कंपनीच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मयंक पारिख यांनी दिली.

यापूर्वी मारुती सुझुकीने २०२० पासून कारची विक्री बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. BS-VI एमिशन निकष लागू झाल्यानंतर डिझल कारची विक्री बंद करणार असल्याचे सांगितले होते. नव्या निकषांनुसार डिझेल इंजिन अपग्रेड करण्यासाठी मोठा खर्च येणार असल्याचे मारुती सुझुकीने स्पष्ट केले होते. उत्पादन खर्चाच्या दृष्टीने डिझेल कार महागड्या ठरणार असल्यामुळे कार उत्पादक कंपन्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू आहे.