Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आंतरजातीय विवाहाच्या रागातून पेटवून दिलेल्या मुलीचा मृत्यू, पतीची प्रकृती गंभीर : काका , मामा अटकेत वडील फरार

Spread the love

अंतर जातीय विवाह केलेला मंगेश हा लोहार समाजाचा असून उत्तर प्रदेशातून निघोज येथे चरितार्थासाठी  आला होता  तर भरतिया कुटुंब हे पारशी समाजाचे आहेत. मंगेश याचे कुटुंबही काही वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी निघोज येथे स्थायिक झालेले आहे. आपल्या जातीतील तरूणाशी रूख्मिणी हिने विवाह करावा अशी तिचे वडील, काका तसेच मामाची इच्छा हाती. मात्र त्यास झुगारून दोघांनीही विवाह केला. दोघांमधील भांडणाची संधी साधून वडील, काका तसेच मामाने दोघांचाही काटा काढला.

सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केल्याच्या रागातून जिवंत जाळण्यात आलेल्या मंगेश रणसिंग (वय २३) व रुख्मिणी रणसिंग (वय १९) यांच्यापैकी रुक्मिणी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रेमविवाह केला म्हणून तिचे वडील, काका तसेच मामा यांनी दोघांच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा मृत्यूपूर्व जबाब रूक्मिणीने दिला असून त्यानुसार तिघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन काका व मामास अटक करण्यात आली आहे, तर तिचे वडील फरार झाले आहेत.

यासंदर्भात तपासी अधिकारी पोलीस  उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार  निघोज येथे राहणाऱ्या मंगेश रणसिंग व तेथीलच  वाघाचा वाडा येथे राहणारी रूख्मिनी भरतिया यांचे प्रेमसबंध होते. त्यातूनच त्यांनी दिवाळीमध्ये आळंदी येथे जाऊन विवाह केला होता. या विवाहास  विशेषत: रूख्मिणीच्या वडिलांचा विरोध होता. आळंदी येथील विवाहास मात्र रूख्मिनीची आई उपस्थित होती. मंगेश व त्याचे कुटुंबीय निघोज परिसरात गवंडीकाम करीत  तर रूख्मिणीचे आई वडील तसेच नातलगही बांधकामावर बिगारी म्हणून काम पाहत होते. लग्नानंतर मंगेश व रूख्मिणी हे कवाद कॅम्प येथील मंगेश याच्या घरी राहत होते.

दि. ३० रोजी मंगेश व रूख्मिणी यांच्यात स्वयंपाकावरून किरकोळ वाद झाला. त्या रागातून ती त्याच दिवशी आई-वडिलांकडे निघून गेली. दुसऱ्या दिवशी दि. १ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमरास मंगेश रूख्मिणीस आणण्यासाठी तिच्या  आई-वडिलांकडे गेला असता तिला घेऊन जाण्यास रूख्मिणीचे वडील, काका तसेच मामा यांनी विरोध केला. रूख्मिणी मात्र मंगेश याच्यासोबत जाण्यास तयार होती. त्यातून वाद निर्माण होऊन तिचे वडील, काका  तसेच मामा यांनी मंगेश  याचे हात बांधून बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. ते पाहून मंगेश यास  मारू नका अशी विनवणी रूख्मिणी करीत होती. मात्र त्यास न जुमानता  मंगेश यास अमानुष मारहाण सुरूच होती. न रहावून रूख्मिणी हिने  मंगेश यास मिठी मारली. तीच संधी साधून दोघांच्याही अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्यात आले. नंतर घरास कुलूप लावून सर्वजण घराबाहेर निघून गेले.

दोघांचा आरडाओरडा ऐकूण आजूबाजूचे लोक तेथे धावून आले. त्यांनी घराचे दार तोडून घरात प्रवेश केला. त्यांना सुरूवातीस प्राथमिक आरोग्य केंद्रात, तेथून नगर येथील जिल्हा रूग्णालयात व त्यानंतर पुणे येथील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून वडील, काका तसेच मामा यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तपासी अधिकारी  विजयकुमार  बोत्रे  यांनी पुणे येथे जाऊन दोघांचेही जबाब नोंदविले. रूख्मिणी हिने दिलेल्या जबानुसार वडील, काका व मामा यांनी दोघांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. रूख्मिणी ही ७० टक्के तर मंगेश हा ६० टक्के भाजलेला आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रुक्मिणीचा मृत्यू झाला तर मंगेश याची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

रूक्मिणीच्या जबाबानुसार तिचे वडील रामा रामफल भरतिया, काका सुवेंद्रकुमार रामफल भरतिया तसेच मामा घनश्याम मोहन राणेज यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. काका सवेंद्रकुमार भरतिया तसेच मामा धनश्याम राणेज यांना पोलिसांनी अटक केली असून  रूखिणीचे वडील रामा भरतिया मात्र पसार झाले आहे.  काका व मामाला पारनेरच्या न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी दिली. सहाययक पोलीस अधीक्षक मनिष कलवाणीया यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाच्या सुचना दिल्या. पोलीस निरीक्षक  बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे हे पुढील तपास करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!