Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पाचव्या टप्प्यात ५१ मतदारसंघात आज मतदान

Spread the love

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या देशातील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह सात राज्यांमध्ये हे मतदान होईल. यावेळी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

पाचव्या टप्प्यात उद्या बिहारमधील ५, जम्मू-काश्मीरमधील २, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशमधील ७, राजस्थानमधील १२, उत्तर प्रदेशातील १४ आणि पश्चिम बंगालमधील ७ मतदारसंघांत मतदान होत आहे. या टप्प्यात ७ राज्यांमध्ये होणाऱ्या ५१ मतदारसंघांसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकसभेच्या आतापर्यंत चार टप्प्यांमध्ये ३७४ मतदारसंघांत मतदान पार पडले. या चार टप्प्यांत भाजपचे १६६ खासदार होते. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये १६९ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे ११६ खासदार आहेत. यामुळेच अखेरचे तीन टप्पे हे भाजपसाठी निर्णायक ठरणार आहेत. पाचव्या टप्प्यात ३८ मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचे खासदार आहेत. पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात १४ मतदारसंघांत मतदान होणार असून, १२ मतदारसंघांत भाजपचे खासदार आहेत. तर रायबरेली आणि अमेठी मतदारसंघांमध्ये अनुक्रमे सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे खासदार आहेत. राजस्थानमध्ये मतदान होणाऱ्या १२ पैकी ११ मतदारसंघांमध्ये भाजप तर एका मतदारसंघात काँग्रेसचा खासदार आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आघाडीचे उत्तर प्रदेशात भाजपपुढे आव्हान आहे. त्यामुळे भाजपने प्रचारासाठी या टप्प्यात प्रचंड जोर लावला होता. अमेठीत राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात लढत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठ्या अपेक्षा आहेत, राजस्थान तसेच मध्य प्रदेशमध्ये सध्याच्या जागा टिकवण्याचे आव्हान आहे.

पश्चिम बंगालमध्ये गेल्या निवडणुकीतील यश कायम राखण्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापुढे आव्हान आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसपुढे आव्हान उभे केले आहे. पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी २४ मतदारसंघांमध्ये शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. शहरी भागांत भाजपने जोर लावला आहे. झारखंडमध्ये भाजपविरोधात काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चासह विविध पक्षांच्या महाआघाडीने आव्हान उभे केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!