भारतीय सैन्य ही मोदींची खासगी संपत्ती नाही, पंतप्रधानांनी तरी किमान सैन्याचा अपमान करु नये : राहुल गांधी

Advertisements
Spread the love

सर्जिकल स्ट्राइक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले नाही, भारतीय सैन्याने केले आहे. भारतीय सैन्याची ७० वर्षांची कामगिरी बघा, त्यांना नेहमी यशच मिळाले आहे. पण सैन्याच्या कामगिरीवरुन राजकारण करणे चुकीचे आहे, अशा टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव होणारच असा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मसूद अझर प्रकरणी राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. मसूद अझरची सुटका भाजपाच्या काळातच झाली होती, मात्र काँग्रेसने कधीही दहशतवाद्याला सोडले नव्हते, असा दावा त्यांनी केला. निवडणुकीतील मतदानाच्या चार टप्प्यांनंतर मोदींचा पराभव होणार हे स्पष्ट झाले आहे. शेतकरी, भ्रष्टाचार, रोजगार हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत, असे त्यांनी सांगितले.

सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय घेणाऱ्या मोदी सरकारचाही त्यांनी समाचार घेतला. भारतीय सैन्य ही मोदींची खासगी संपत्ती नाही, सैन्य हे देशासाठी आहे. जर मोदी सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय घेत असतील तर हा भारतीय सैन्याचा अपमान आहे. सैन्याच्या कामगिरीवरुन राजकारण करु नका. पंतप्रधानांनी तरी किमान सैन्याचा अपमान करु नये, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. निवडणूक जिंकणे हे काँग्रेसचे लक्ष्य असून पंतप्रधान कोण होणार, हे जनताच ठरवेल, असे त्यांनी सांगितले.

राफेल करारावरुन टीका करताना राहुल गांधी म्हणाले, चौकीदार चोर आहे हे खरं आहे. चौकीदाराने हजारो कोटी रुपये त्याच्या उद्योगपती मित्रांच्या खिशात टाकले. पंतप्रधानांकडे तज्ज्ञमंडळी नाहीत, जी आहेत त्यांचा वापर केला जात नाही. त्यामुळेच राफेल करारावर मोदी माझ्यासोबत खुली चर्चा करत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.