Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकारच नाही : शरद पवार

Spread the love

एक गृहमंत्री (आर. आर. पाटील) नक्षलग्रस्त भागातील लोकांचा, अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, विकासकामांना गती देण्यासाठी, नक्षलवादी कारवाया थांबाव्यात म्हणून जीवापाड मेहनत घेत होता आणि दुसरा गृहमंत्री (देवेंद्र फडणवीस) या भागात फक्त पुष्पचक्र वाहायला जातो, असा टोला लगावताना ‘या मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकारच नाही’, अशा शब्दांत गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले.

दिवंगत आर. आर. पाटील गडचिरोलीचे नव्हते. तरीही या विभागाचे पालकमंत्रिपद द्या, असा त्यांनी आग्रह धरला होता. महिन्यातून त्यांच्या एक-दोन चकरा तरी गडचिरोलीत असायच्या. भामरागडच्या दुर्गम भागात गृहमंत्री पाटील लोकांना धीर द्यायला मोटरसायकलवर जायचे, अशी आठवण करून देत सध्याचे गृहमंत्री कसे अपयशी आहेत, हे सांगण्याचा पवारांनी प्रयत्न केला.

माझ्याकडे जेव्हा राज्य सरकारची जबाबदारी होती, तेव्हा पोलीस अधिकारी व आयएएस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न केवळ कायदा सुव्यवस्थेचा नसून विकासाच्या बाबतीत एखादा परिसर मागे राहिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून उद्भवलेला आहे, हे लक्षात आणून दिले होते. यातून निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेचा फायदा घेत नक्षल प्रवृत्ती पुढे आली. विकास नको आणि परिस्थिती तशीच राहावी, ही त्यांची अपेक्षा आहे. हे लक्षात घेऊन अर्थसंकल्पात गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी आम्ही स्वतंत्र विकासाचे बजेट दिले होते, असेही पवारांनी पुढे नमूद केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील दुष्काळाच्या भीषण स्थितीवरही पवारांनी मार्गदर्शन केले. याबाबत राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!