Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

Spread the love

सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट

राज्यात दहा मतदारसंघात उद्या गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी आज रवाना झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत; तर त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे.

या टप्प्यातील सर्वाधिक 36 उमेदवार बीड मतदार संघात असून सर्वात कमी 10 उमेदवार लातूर मतदार संघात आहेत. या व्यतिरिक्त बुलढाणा 12, अकोला 11, अमरावती 24,  हिंगोली 28, नांदेड 14,  परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

15 पेक्षा जास्त उमेदवार असलेले 4 मतदार संघ असून यापैकी बीड मतदार संघात एका कंट्रोल युनिटमागे 3 बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदार संघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट तर अन्य 6 मतदार संघात प्रत्येकी 1 बॅलेट युनिट लागणार आहेत.  या निवडणुकीसाठी 62 हजार 700 ईव्हीएम (37 हजार 850 बॅलेट युनिट आणि 24 हजार 850 कंट्रोल युनिट) तर सुमारे 27 हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.

दुसऱ्या टप्प्यात मतदान होणारे मतदार संघ : बुलढाणा- 1979 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 59 हजार), अकोला – 2085 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 61 हजार), अमरावती – 2000 मतदान केंद्र, (एकूण मतदार 18 लाख 30 हजार), हिंगोली- 1997 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 32 हजार), नांदेड – 2028 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 18 हजार), परभणी – 2174 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 84 हजार), बीड – 2325 मतदान केंद्र (एकूण मतदार 20 लाख 41 हजार),उस्मानाबाद – 2127 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 86 हजार), लातूर – 2075 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 83 हजार), सोलापूर – 1926 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 50 हजार).

आपलं सरकार

Click to listen highlighted text!