Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

FIR : योगी आणि मायावतींना २४ तासांची नोटीस आणि मोदींच्या भाषणाची अद्याप चौकशी करतोय निवडणूक आयोग !!

Spread the love

अभिव्यक्ती …. FIR

देशात सध्या लोकसभेचे वारे वाहत असताना काल पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले . दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाकडून वादग्रस्त नेत्यांसंदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याने लोक निवडणूक आयोगाकडे संशयाने पाहत आहेत . भारतीय सैन्याला  दिवसाढवळ्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असणारा माणूस जेंव्हा ” मोदी सेना ” म्हणतो तरीही निवडणूक अयोग योगी महाराजांना ” पुढे असे बोलू नका ” म्हणून समज देतो आणि सोडून देतो याला काय म्हणायचे ? दुसरीकडे दस्तुरखुद्द पंतप्रधानच आदर्श आचारसंहितेची ऐशी तैशी करीत सैनिकांच्या नावाने नव मतदारांना मते मागतात आणि निवडणूक अयोग त्यांच्या भाषणाचा अभ्यास करण्यात मग्न असल्याचे सांगण्यात येत आहे . मतदानाचा पहिला टप्पा पार पडला तरी आयोगाचा अभ्यास आणि तपास चालू  आहे या कारवाईला काय म्हणावे तेच कळत नाही.

मोदी सेनेच्या पहिल्या प्रकरणात  सोडून दिल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांनी पुन्हा ” तुमचा अली तर आमचा बजरंग बली ” म्हणत देशात धार्मिक दुही निर्माण करण्याचे कारस्थान केले आहे .  महाराष्ट्रात ” खान पाहिजे कि बाण पाहिजे ” अशी भाषा कार्यकर्ते दबक्या सुरात  करतात पण भाजप सारख्या सत्ताधारी पक्षाचे पदारूढ नेते जाहीर सभांमधून उघडपणे हिंदू -मुस्लिम अशी दरी निर्माण करणारी भाषणे देतात आणि निवडणूक अयोग्य त्यांच्याविरुद्ध कुठलीही ठोस कारवाई करीत नाही हे खेदाची आणि चिंताजनक बाब आहे .

महाराष्ट्रात भाजप आणि सेनेचे लोक आम्ही फक्त हिंदुत्वाचे राजकारण करतो आणि त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत असे उजळ माथ्याने सांगतात तरीही त्यांचे काहीही बिघडत नाही कारण त्यांचे हिंदुत्व हेच खरे राष्ट्रीयत्व आहे .  इतरांनी मात्र मुस्लिमांवरील अन्यायाच्या संदर्भात काही जरी बोलले तरी मुस्लिमांचा अनुनय केला म्हणून गळा काढण्यात येतो हि वस्तुस्थिती आहे . मुळात धर्मनिरपेक्षता हा या देशाच्या घटनेचा मूळ गाभा आहे  आणि या गाभ्याला नख लावण्याचे काम भाजपनेते करीत असले तरी त्याकडे काणा डोळा करण्यात येतो .

कालची बातमी आहे कि , निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावतींना त्यांच्या वादग्रस्त विधानांबद्दल नोटीस बजावली असून  24 तासांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दोन्ही नेत्यांना देण्यात आले  आहेत . नेहमीप्रमाणे माध्यमांचा कयास आहे कि , या नेत्यांवर आचारसंहितेच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाई होऊ शकते. पण तसे होईल कि नाही सांगता येत नाही . खरे तर निवडणूक अयोग्य हि एक स्वायत्त संस्था असून तिला कोणतीही कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार आहे .

जगाला ज्ञान शिकविणाऱ्या पंतप्रधान म्हणविणाऱ्या नरेंद्र मोदी यांचाही लातूरच्या सभेत तोल गेला , तसे ते नेहमीच डळमळीत असतात पण यावेळी जरा जास्तच झाले . पुलवामा किंवा बालाकोटच्या हवाई हल्ल्याचे कोणीही राजकारण करणार नाही अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या पण लातूरच्या सभेत मोदींनी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना भावनिक आवाहन करताना थेट पूलवामात शाहिद झालेल्या सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण आणि बालाकोट मध्ये कारवाई केलेल्या सैनिकांचा गौरव म्हणून  कमळाला मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे जाहीर आवाहन केले आणि त्यांनी स्वतःच आपली वाहवा केली . खरे तर एका जबाबदार पदावर असलेल्या नेत्याला असे वक्तव्य करणे अशोभनीय आहे परंतु “सत्तातुराना भय ना लज्जा !! ” असेच म्हणावे लागेल.

आता म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालाकोट एअर स्ट्राइकबद्दलच्या विधानाची निवडणूक आयोगाकडून तपासणी सुरू आहे. मोदींनी बालाकोट एअर स्ट्राइकचा उल्लेख करत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय नमो टीव्हीवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. आता हि कारवाई निवडणूक अयोग खरेच करणार कि , मोदींना समज देऊन प्रकरण संपवणार हा खरा प्रश्न आहे .

असे सांगण्यात येते कि , ” हिंदूंकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तुमचा अली, तर आमचा बजरंगबली ” असं वादग्रस्त विधान योगी आदित्यनाथ मेरठमधील प्रचारसभेत केलं होतं. सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलं होतं. तर मायावतींनी मुस्लिमांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. या वादग्रस्त विधानांची निवडणूक आयोगाने  दखल घेतली आहे.

हिंदूजवळ भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. देशातील दलित-मुस्लिम ऐक्य शक्य नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते. मायावती मुस्लिमांकडे मतं मागत आहेत. गठबंधनसाठी फक्त मतदान करा आणि स्वतःचं मत दुसऱ्या कोणाला जाऊ देऊ नका, असं त्या सांगत आहेत. त्यामुळे हिंदूकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तसेच तुमचा अली, तर आमचा बजरंगबली असंही ते सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून म्हणाले होते. तर मुस्लिमांनो, काँग्रेस भाजपाला टक्कर देऊ शकत नाही. फक्त महाआघाडीच भाजपाचा पराभव करु शकते. मतविभाजन टाळून महाआघाडीला एकगठ्ठा मते द्या. या सर्व प्रकरणाची निवडणूक आयोग चौकशी करीत आहे. बघूया आता काय निर्णय घेतला जातो ते…

आणखी एक कहर म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तर  आम्ही सत्तेत आल्यानंतर बौद्ध, हिंदू ,शीख वगळता  सर्व घुसखोरांना देशाबाहेर हाकलून देऊ ”असे वक्तव्य जाहीर सभेत तर केलेच केले  पण हेच प्रतिपादन त्यांनी स्वतःच्या ट्विटरवरही टाकले , हि म्हणायची ? यातून जणू या मंडळींना आम्ही कायदा, घटना, धर्मनिरपेक्षता काहीही मानत  नाही आणि जुमानातही नाही असेच जणू त्यांना सुचवायचे आहे. बहुसंख्याक हिंदुत्वाच्या बळावर अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचेच हे कारस्थान आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

दरम्यान निवडणूक आयोगाने खूप चर्चा झाल्या नंतर का होईना पीएम नरेंद्र मोदी यांच्या मोदींच्या बायोपिकवर आणि आता नमो टिव्ही पाठोपाठ नमो टिव्हीच्या कन्टेंटवरही बंदी घातली हे दोन्हीही निर्णय आयोगाने उशिरा का होईना पण घेतले हे योग्यच म्हणावं लागेल आणि आयोगाकडून अशाच निरपेक्ष निर्णयाची अपेक्षा आहे पण हे निर्णय घेण्यास आयोगाने विलंब लावू नये एवढेच !!

>> बाबा गाडे , संस्थापक संपादक, दैनिक महानायक

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!