Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दोन गुंडांची न्यायालयातच ठोका-ठोकी, बचाव करण्यासाठी राव धावला न्यायाधिशाकडे !!

Spread the love

कुख्यात गुंड छोटा राजनचा हस्तक गँगस्टर दिलीप बोरा उर्फ डी. के. राव याच्यावर सत्र न्यायालयाच्या परिसरातच हल्ला झाला आहे. राव आणि त्याचा साथीदार अनिल पाटील यांच्यात बाचाबाची झाली. त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. अखेर पाटीलच्या तावडीतून वाचण्यासाठी रावनं तेथून पळ काढत न्यायाधीशांकडे धाव घेतली, असं सूत्रांनी सांगितलं.

डी. के. राव याचे खंडणी, हत्येचा प्रयत्न आणि खून अशा एकूण ३० गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव आहे. त्यातील अनेक प्रकरणांत त्याची सुटका झाली आहे. दोनदा तो मृत्यूच्या दारातून परतला आहे. खंडणीच्या गुन्ह्याखाली त्याला २०१८मध्ये शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. ‘मकोका’ कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राव आणि त्याचा साथीदार पाटील याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. पोलिसांची दोन पथके त्यांच्यासोबत होती.

सुनावणीसाठी ते दोघे आणि पोलीस इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील पायऱ्यांवर थांबले होते. त्याचवेळी राव यानं पाटीलला एका बिल्डरला मेसेज पाठवून पैशांसंबंधी बोलण्यास सांगितलं. ते पाटीलनं मान्यही केलं. पण उद्धटपणे उत्तर दिल्याचा राग रावला आला. राव यानं पाटीलला कमी आवाजात बोलण्यास सांगितलं आणि त्याच्या डोक्यावर फटका मारलं.

पाटीलनंही चिडून राव याला पकडलं आणि त्याला चोप देण्यास सुरुवात केली. पाटीलच्या ‘टोळी’तील काही लोकही धावून आले. त्यामुळं घाबरून राव यानं तिथून पळ काढला, असंही सूत्रांनी सांगितलं. या घटनेमुळं कोर्ट परिसरात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणी पाटीलनं राव याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!