Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Dantewada Attack: नक्षलवादी हल्ल्यात भाजप आमदार ठार, ४ जवान शहीद, ५ जखमी

Spread the love

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला असून या हल्ल्यात मंडावी यांचा जागीच मृत्यू तर ४ जवान शहीद झाल्याची माहिती हाती आली आहे. भीमा मंडावी यांचा ताफा श्यामगिरी गावातून परतत असतानाच आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी या ताफ्यावर हल्ला चढवला. हल्ल्याची माहिती मिळताच दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक घटनास्थळाकडे रवाना झाले असल्याचे विशेष पोलीस महासंचालक गिधारी नायक यांनी सांगितले. दंतेवाडा जिल्हा बस्तर लोकसभा मतदारसंघाचा भाग असून या मतदारसंघात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

दंतेवाडातील कुआकोंडा भागात हा हल्ला झाला. आमदार भीमा मंडावी प्रचार आटोपून परतत असतानाच नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवत त्यांच्या ताफ्याला लक्ष्य केले. स्फोटात मंडावी यांच्या गाडीसह ताफ्यातील एस्कॉर्ट वाहनही उडवून देण्यात आले. या हल्ल्यात मंडावी यांचा मृत्यू झाला तर ४ जवानही शहीद झाले. हल्ल्यानंतर तातडीने सीआरपीएफ व राज्य पोलिसांची पथकं घटनास्थळी रवाना झाली असून संपूर्ण परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित भागात प्रचारदौरा करू नये, असे भीमा मंडावी यांना पोलिसांकडून सांगण्यात आले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लाव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आयईडी स्फोट घडवून आणल्यानंतर नक्षलवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला. दोन्ही बाजूने गोळीबार झाला. आमदार मंडावी यांच्या मागच्या गाडीत ५ सुरक्षा कर्मचारी होते. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, असेही पल्लाव यांनी पुढे नमूद केले.

हे बलिदान व्यर्थ जाणार नाही: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे नमूद करत पंतप्रधानांनी नक्षलवाद्यांना इशारा दिला. आमदार भीमा मंडावी यांच्यासारखा निष्ठावान कार्यकर्ता गमावल्याने अतीव दु:ख होत असल्याच्या भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!