Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शत्रुघ्न सिन्हा यांचा अखेर काॅंग्रेसमध्ये प्रवेश

Spread the love

भाजपमधील बंडखोर खासदार, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारमधील पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये सध्या ‘वन मॅन आर्मी, टु मॅन शो’ सुरु आहे अशा शब्दात खासदार, अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत सिन्हांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून यावेळी पंतप्रधान मोदी, भाजप पक्षाध्यक्ष, अमित शहा आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर सिन्हांनी सडकून टीका केली आहे.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत सिन्हांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर सिन्हांनी उपस्थितांना संबोधित केलं. भाजपला ३९व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. भाजपमध्ये लोकशाहीचे हुकुमशाहीत रुपांतर होताना आपण पाहिलं आहे असं ते म्हणाले. ‘भाजपतील वरिष्ठ नेत्यांना मार्गदर्शक मंडळात ढकलण्यात आलं. या मार्गदर्शक मंडळाची एकही बैठक झाली नाही. आडवाणींना यामुळे अखेर ब्लॉग लिहावा लागला. मुरली मनोहर जोशी आज कुठे आहेत? ’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तब्बल तीन दशकांहून अधिक काळ भाजपसोबत राहिलेले शत्रुघ्न हे सध्या पाटना साहिब मतदारसंघाचे खासदार आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रात त्यांनी मंत्रिपदही भूषवलं होतं. मात्र, भाजपमध्ये मोदीयुग सुरू झाल्यापासून ते राजकीयदृष्ट्या अडगळीत पडले होते. त्यांना मंत्रिपदाची संधीही देण्यात आली नाही. त्यामुळं नाराज असलेले सिन्हा गेली पाच वर्षे सातत्यानं पक्षनेतृत्वार दुगाण्या झाडत होते. गेल्या वर्षभरापासून त्यांनी हा विरोध आणखी तीव्र केला होता. विरोधकांच्या व्यासपीठांवरही हजेरी लावायला सुरुवात केली होती. त्यामुळं ते लवकरच भाजप सोडणार अशी चर्चा होती. पक्षानं लोकसभेचं तिकीट नाकारल्यानं ही चर्चा खरी ठरली.

अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी सिन्हा यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी काँग्रेसची निवड केली. त्यांना पाटणा साहिबमधून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

2 thoughts on “शत्रुघ्न सिन्हा यांचा अखेर काॅंग्रेसमध्ये प्रवेश

Comments are closed.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!