Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

माझ्या परिवाराची चिंता करण्यापेक्षा लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची चिंता करावी : शरद पवारांची मोदींवर तोफ

Spread the love

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशात परिवर्तन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करून सद्य स्थितीत देशासमोर अनेक समस्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या परिवाराची चिंता लागली आहे. माझ्या परिवाराची चिंता करण्यापेक्षा लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या भाजपच्या जेष्ठ नेत्यांची चिंता करावी, असा उपरोधिक टोला पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. केंद्र सरकारच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या सर्वांधिक आत्महत्या झाल्याचा आरोप  करताना ते म्हणाले कि ,  कृषी मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना केंद्र सरकार या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. मी कृषी मंत्री असतांना शेतकऱ्यांचे सुमारे ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज सरसकट माफ करून व्याज दर १२ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणला.

पाच वर्षांपूर्वी मतदारांना खोटी आश्वासने देऊन तसेच मतदारांची दिशाभूल करून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराला मतदार कंटाळले असून, देशात लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मोठी परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. या सभेला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणून मुख्यमंत्र्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे आता राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांचे विरुद्ध कोणता गुन्हा दाखला करावा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी शरद पवार यांनी राफेल विमान खरेदी घोटाळा, तसेच देशात झालेले अनेक दहशतवादी हल्ले, केंद्र सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय यासह अनेक विषयांवर आक्रमक भाषेत टीका केली.

या सभेत विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, लोकसभेचे उमेदवार गुलाबराव देवकर, आमदार डॉ.सतीश पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांचेसह उपस्थित आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख, अरुण पाटील, संतोष चौधरी, मनीष जैन, शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, ईश्वरलाल जैन, जगन सोनवणे, डी. जी. पाटील,ललिता पाटील यांचेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष कवाडे गट व गवई गट व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!